पनवेल शहराला अतिक्रमणमुक्त करणार

By Admin | Updated: June 3, 2017 06:38 IST2017-06-03T06:38:06+5:302017-06-03T06:38:06+5:30

पनवेलचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होताच फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. फेरीवाल्यांनी

Panvel city will be encroached | पनवेल शहराला अतिक्रमणमुक्त करणार

पनवेल शहराला अतिक्रमणमुक्त करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होताच फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. फेरीवाल्यांनी आपल्या हातगाड्या पूर्वीप्रमाणे रस्त्यावर थाटल्या आहेत. आता पुन्हा एकदा पनवेलच्या आयुक्तपदी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती झाल्याने पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनविणार असल्याचे मत आयुक्त सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
आॅक्टोबर २०१६मध्ये पनवेल पालिकेची स्थापना झाली. नवीन व प्रथम आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेलच्या नागरिकांना अपेक्षित असे शहर बनविण्याचा निश्चय केला होता. सुधाकर शिंदे महापालिकेचे आयुक्त असताना शहरातील हातगाड्या, बेकायदा फलक, अनधिकृत बांधकामे यावर सरसकट कारवाई केली होती. बेकायदा फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, महापालिकेची निवडणूक लागल्याने व शिंदे हे भाजपाच्या मंत्र्यांचे भाऊ असल्याने पनवेल पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने त्यांची उल्हासनगर येथे बदली केली होती. मतदान पार पडल्यानंतर आयुक्त शिंदे यांची पुन्हा एकदा पनवेल महापालिकेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्र मण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली झाल्याचे समजताच हातगाडीचालक व अतिक्रमण करणारे खूश झाले व त्यांनी आपल्या हातगाड्या रस्त्यावर आणण्यास सुरुवात केली. सुधाकर शिंदे यांच्या जागी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची पनवेलमधील अतिक्रमणसंबंधी ठोस भूमिका घेतलेली नव्हती. त्यामुळे शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत होते. आयुक्त सुधाकर शिंदे हे जाताच शहरात हातगाड्या, अनधिकृत फलक वाढू लागले. सुधाकर शिंदे यांच्या कारवाईने येथील नागरिक सुखावले होते तर अतिक्र मण करणारे दु:खी झाले होते. मात्र, आयुक्तांच्या बदलीने नागरिक नाराज झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. शहर बकाल दिसू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. मात्र, पालिकेचे अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने कारवाई होत नसल्याचे उत्तर मिळत होते.

Web Title: Panvel city will be encroached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.