पनवेलमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अर्ज वाऱ्यावर, नागरी सुविधा केंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 02:53 IST2019-08-17T02:53:22+5:302019-08-17T02:53:51+5:30
महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात परिसरातील व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते. ही कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे त्यांची हाताळणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.

पनवेलमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी अर्ज वाऱ्यावर, नागरी सुविधा केंद्राची दुरवस्था
- वैभव गायकर
पनवेल : महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात परिसरातील व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते. ही कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे त्यांची हाताळणी योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. मात्र, पनवेल महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील जन्म-मृत्यू नोंदणीचे अर्ज अडगळीत ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणाहून इतर प्रभागांतही जन्म-मृत्यू नोंदणीचे अर्ज पाठविले जातात. मात्र, सध्या हे अर्ज बंदिस्त कपाट अथवा जागेत न ठेवता उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अर्ज कुरतडू नये म्हणून याठिकाणी उंदरासाठी पिंजरेही लावण्यात आले आहेत.
महापालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नोंदणी करण्यासाठी ठरावीक नमुन्याचा अर्ज भरून द्यावा लागतो. पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भांडार विभाग हे अर्ज घाऊक पद्धतीने छपाई करून पालिकेत ठेवतो. मात्र, अर्ज ठेवण्यासाठी सुयोग्य जागा नसल्याने नागरी सुविधा केंद्रात उघड्यावर एका खिडकीजवळ अर्जाचे ढीग पडलेले दिसतात. सध्या पाऊस सुरू असल्याने आणि अगदी खिडकीजवळ ठेवण्यात आल्याने, ते भिजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अर्ज सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी ते कुरतडू नये म्हणून सुयोग्य व्यवस्था करण्याऐवजी महापालिकेकडून या ठिकाणी उंदीर पकडण्यासाठी केवळ दोन पिंजरे ठेवण्यात आले आहेत.
पनवेल महापालिकेचे मुख्यालय दोन इमारतीमध्ये विभागले गेले आहे. पैकी नव्या इमारतीमध्ये नागरी सुविधा केंद्र आहे. या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. विशेष म्हणजे या केंद्रातच जन्म-मृत्यू नोंदणी विभागासह आवक-जावक, संगणक कक्ष या विभागांचा समावेश आहे. अतिशय अपुºया जागेत हा विभाग कार्यान्वित असताना दोन महिन्यांपूर्वी सुरक्षा विभागालाही याच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने जागेची समस्या आणखीनच बिकट झाली आहे. सुरक्षा विभाग याठिकाणी स्थलांतरित झाल्यापासून जन्म-मृत्यू नोंदणी अर्ज बाहेर काढण्यात आले. एका टेबलावर हे सर्व अर्ज कोंबून ठेवण्यात आले आहेत. पावसात भिजलेल्या छत्र्या, बंद संगणक याच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. नागरी केंद्राच्या गेटवर सुरक्षा विभागाने टेबल मांडला आहे. जागेअभावी काही विभाग स्थलांतरित करण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महत्त्वाचे कागदपत्र ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेने कॉम्पॅक्टर खरेदी केले आहे. जन्म- मृत्यू नोंदणी विभागातील अर्ज अशा प्रकारे उघड्यावर ठेवले गेले असतील तर ते त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्यात येतील.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त,
पनवेल महापालिका