पनवेल परिसराला पुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:57 AM2018-07-09T03:57:38+5:302018-07-09T03:57:58+5:30

  मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.

 Panvel area fears floods | पनवेल परिसराला पुराची भीती

पनवेल परिसराला पुराची भीती

Next

- वैभव गायकर
पनवेल -  मुसळधार पावसाने दोन दिवस पनवेल परिसराला झोडपले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, तालुक्यातील डोळघर आणि बारापाडा गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी पावसाचा ओघ ओसरल्याने या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.
बारापाडा आणि डोळघर ही कर्नाळा अभयारण्य तसेच नदीजवळ असल्याने नदीने पातळी गाठल्यास ते पाणी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या वरून जात असते. मागील अनेक वर्षांपासून जोरदार वृष्टीमुळे या गावांना हा फटका बसत आला आहे. पनवेल तहसील कार्यालयाच्या मार्फत पनवेल शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी बाहेर गेले असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. विशेष म्हणजे, या मार्गावर पडलेले खड्डे ही चिंतेची बाब बनत चालली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली ते खारघर या ठिकाणी सुमारे चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेष म्हणजे, तीन ते चार कि.मी. वाहतूककोंडी होऊनही खारघर टोलनाक्यावर टोलवसुली सुरूच होती. महानगरपालिकेच्या मार्फतही ठिकठिकाणी आपत्कालीन पथके पाचारण करण्यात आली होती.

महामार्गावर कोंडी
सायन - पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. रविवारीही तुर्भे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तुर्भे वाहतूक चौकीच्या परिसरामध्ये रोडची दुरवस्था झाली असून, पाऊस पडला की येथे चक्काजाम होत असून, वाशीपर्यंत वाहतूककोंडी होत आहे. कळंबोली, टोलनाका परिसरामध्येही वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

धरणाचे पाणी सोडल्यास बाधित होणारी गावे

जांभिवली (बामणोली) धरणक्षेत्र सावणे, जांभिवली.
सावणे धरण सावणे, देवळोली
उसण धरण सावळे
गाढेश्वर (देहरंग)


तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्र

पनवेल (ग्रामीण)
शिलोत्तर-रायचूर, पलीदेवद, आसुडगाव, विचुंबे, काळुंद्रे (भिंगारी) देवद, उसर्ली खुर्द, कामोठे, नौपाडा
पनवेल (शहर)
कोळीवाडा, पटेल मोहल्ला, बावन बंगला, मिडल क्लास सोसायटी.
ओवळे (विभाग)
वडघर, कारंजाडे, वाघिवली, कोळखे, पळस्पे.
मोरबे (विभाग)
शिरवली मोहदार, चिंध्रन, धोदानी, चिपळे, केवाले, हरिग्राम.
पोयंजे (विभाग)
वावेघर, गुळसुंदे, टुरडे, आपटे, कळिवले, कारंडे खुर्द, कासप, सवणे.
तळोजे (विभाग)
पडघे, नावडे, रोडपली, घोटगाव, तळोजे मजकूर, तळोजा पाचनंद, कळंबोली वसाहत.


दरड कोसळण्याची संभाव्ये गावे
पनवेल : चिखले, वारदोली, आकुर्ली, माची प्रबळ.
ओवळे : वडघर, करंजाडे, ओवळे, कोळखे, पळस्पे.
मोरबे : मोहदर, धोदानी, खयरेवाडी, कोंडाळे, हरिग्राम, खानाव, वाजे, चेरवली.
पोयंजे : लडीवाली, कालिवली, सावणे, सारसाई.
तळोजा : चाळ, पाले बु.

नवी मुंबईमध्ये
वृक्ष कोसळले
नवी मुंबईलाही रविवारी पावसाने झोडपले. शहरात वृक्ष कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. सीबीडी सेक्टर १ व एनआरआय सेक्टर ५० मध्येही वृक्ष कोसळल्याची नोंद झाली आहे. शहरातील भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडू लागल्या असून, शिरवणे पुलाच्या खालील रोडवर खड्ड्यामुळे दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

पर्यटनस्थळी कडक बंदोबस्त
गाढीसह सर्व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्यामुळे पनवेल तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नदीपात्र व धबधब्यांच्या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात जाणाºया सर्व वाहनांची तपासणी केली जात होती. पोलीस बंदोबस्तानंतरही अनेक पर्यटक नजर चुकवून नदीमध्ये डुबक्या मारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सायंकाळपर्यंत या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता.

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गावात काही ठिकाणी पावसाचे पाणी शिरले होते. मात्र, कोणाचे नुकसान झाले नाही.
- शेखर कानडे,
रहिवासी,
बारापाडा

संभाव्य धोके असलेल्या गावांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत योग्य नियोजन करता यावे, याकरिता लावण्यात आलेल्या बैठकीला गावातील सदस्य हजर होते.
- बी. टी. गोसावी,
नायब तहसीलदार

Web Title:  Panvel area fears floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.