पनवेलमध्ये सम विषम पार्किंगची ऐशीतैशी
By Admin | Updated: September 2, 2016 03:54 IST2016-09-02T03:54:11+5:302016-09-02T03:54:11+5:30
तालुक्याचे ठिकाण असल्याने पनवेल शहरात अनेक सरकारी कार्यालये, न्यायालय, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, सराफा बाजार, आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत.

पनवेलमध्ये सम विषम पार्किंगची ऐशीतैशी
- वैभव गायकर, पनवेल
तालुक्याचे ठिकाण असल्याने पनवेल शहरात अनेक सरकारी कार्यालये, न्यायालय, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, सराफा बाजार, आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मुख्य बाजारपेठ असल्याने गणेशोत्सवानिमित्त खरेदी करणाऱ्यांचीही शहरात गर्दी होत आहे. वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरात सम-विषम पार्किंगचा नियम लागू असला तरी चालकांकडून नियमाची पायमल्ली होत आहे. नेमक्या कोणत्या ठिकाणी कारवाई करावी, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून वाहतूक नियंत्रित करताना त्यांची तारांबळ उडत आहे.
अपुरे मनुष्यबळ व चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी जॅमर बसविण्यात आले आहेत. मात्र वाहनांच्या संख्येत त्यांची संख्या मोजकीच असल्याने वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत. काँक्रीटीकरणामुळे काही रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अनधिकृत पार्र्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता कमी पडत आहे. शहरातील बहुतांश जुन्या इमारतीमध्ये पार्र्किंगची सुविधा नसल्याने ही वाहनेही रस्त्यावरच दुतर्फा उभी केली जातात. शिवाजी पुतळा ते रु पाली टॉकीज या सुमारे १ किमीपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे चालकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. कर्नाळा सर्कल, विरुपाक्ष मंदिर, महात्मा फुले रस्ता, बाजारपेठ याठिकाणीही कोंडी होत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. सध्या केवळ ७ जॅमर उपलब्ध आहेत. वाहनांच्या संख्येत हा आकडा कमी आहे. पनवेल नगरपरिषदेकडे ५० जॅमरची मागणी केली आहे, मात्र अद्याप ते मिळालेले नाहीत.