पांडवकडा यंदाही बंदच

By Admin | Updated: June 16, 2016 01:24 IST2016-06-16T01:24:13+5:302016-06-16T01:24:13+5:30

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक धबधबा असणे ही कल्पनाच सुखावणारी आहे. म्हणूनच खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत

The Pandavadra bandh this time | पांडवकडा यंदाही बंदच

पांडवकडा यंदाही बंदच

- वैभव गायकर, पनवेल

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक धबधबा असणे ही कल्पनाच सुखावणारी आहे. म्हणूनच खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र पर्यटकांचा अतिउत्साहीपणा हा त्यांच्याच जीवावर बेतत असल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले आहे. यामुळेच वन विभागाने धबधब्यावर प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
सिडकोने वसविलेल्या खारघर शहराचे रूपांतर लवकरच स्मार्ट सिटीत होणार आहे. शहराला नैसर्गिक सांैदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा हा देखील शहराला ओळख प्राप्त करून देणारे पर्यटन स्थळ बनले आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. वन विभागाने घातलेली बंदी झुगारून पर्यटक हा निर्णय घेत असतात. काहींना यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आजवर या ठिकाणी बळी गेलेल्या पर्यटकांचा आकडा शेकडोच्या वर गेलेला आहे. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड, पनवेल आदी ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. दरवर्षी वन विभाग पर्यटकांना या ठिकाणी प्रवेशबंदी असल्याचे बोर्ड लावत असते. यावर्षी देखील या कामाला सुरु वात झाली आहे. दर्शनी भागात पर्यटकांना प्रवेशबंदी असल्याचे सूचना फलक आम्ही लावणार आहोत, असे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. परवानगीशिवाय वन हद्दीत प्रवेश करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पर्यटकांनी कायदा हातात न घेता नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाली की धबधबा सुरू होतो. त्यानुसार आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करीत असतो. स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेतली जाते, त्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात.

निसर्गप्रेमींमध्ये नाराजी
पांडवकडा धबधबा हा पावसाळ्यात सुरू होतो. निसर्गप्रेमी पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी अथवा त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी दुरून खारघरमध्ये येत असतात. मात्र या ठिकाणी आल्यावर त्यांच्या लक्षात येते की धबधब्यावर बंदी आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये मोठी नाराजी आहे. काही अटी वा शर्तीच्या आधारे या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशाची परवानगी द्यावी, अशी मागणी पर्यटनप्रेमी करीत आहेत.

वन विभागाच्या उपाययोजना
पांडवकडा धबधब्यावरून पडलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असतो. या गोष्टीचा अंदाज न लागलेले पर्यटक पाण्यात उतरत असतात. यामुळे अनेक वेळा दुर्घटना घडल्या असून काही पर्यटकांचा मृत्यू देखील झाला आहे. दरवर्षी अनेक सूचना करून देखील पर्यटक आपला जीव गमावत असतात. यामध्ये तरु ण व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश सर्वात जास्त असतो. धबधब्यावरून जोरात वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी याठिकाणी वनविभागाने दोन दगडी बंधारे बांधले असल्याचे शिवाजी ठाकरे यांनी सांगितले.

तळीरामांवर निर्बंध
पावसाळ्यात बंदी झुगारून अनेक पर्यटक पांडवकडा धबधब्याजवळ मद्यप्राशन करीत असतात. याप्रकारामुळे परिसरात बाटल्यांचा खच पडतो. तसेच मद्यधुंद अवस्थेत तोल धबधब्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तळीरामांवर कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

Web Title: The Pandavadra bandh this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.