पामबीच रोड ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात ९ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी
By नामदेव मोरे | Updated: February 29, 2024 18:57 IST2024-02-29T18:56:42+5:302024-02-29T18:57:05+5:30
नियमबाह्यपणे जॉगींगसाठीही उपयोग

पामबीच रोड ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात ९ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी
नवी मुंबई : अतीवेग व निष्काळजीपणामुळे पामबीच रोड मृत्यूचा सापळा ठरत आहे. गत वर्षभरात अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ९ गंभीर जखमी झाले आहेत. ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पामबीच रोडचा चालणे व धावण्याचा व्यायाम करण्यासाठीही उपयोग केला जात असून त्यामुळे अपघात होवून जीवीतहानी होण्याची शक्यताही वाढली आहे.
नवी मुंबईमधील महत्वाच्या रस्त्यांमध्ये पामबीच राेडचा समावेश आहे. सायन - पनवेल महामार्गावरील भार कमी करण्यासाठी व वाशी ते बेलापूर अंतर कमी वेळेत पूर्ण करता यावे यासाठी या रस्त्याची निर्मीती केली आहे. महानगरपालिकेने या रोडवर अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. स्पीड लिमीटचे सुचना फलक लावले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारले आहेत. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला व दुभाजकाला लागून लोखंडी बॅरीगेट्स तयार केले आहेत.
वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या रोडवरील अपघात वाढत आहेत. पामबीच रोडवर बहुतांश वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करत आहेत. अतीवेगामुळे वाहनांवरील ताबा सुटून अपघात होत आहेत. वर्षभरात २३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त दाखल न झालेल्या किरकोळ अपघातांची संख्याही खूप आहे.
पामबीच रोडवर पादचाऱ्यांना मनाई आहे. परंतु रोज सकाळी चालणे व धावण्याचा व्यायाम करण्यासाठी अनेक नागरिक पामबीच राेडचा उपयोग करत आहेत. यापुर्वी अपघातामध्ये पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून धावण्यासाठी पामबीच रोडचा उपयोग सुरूच आहे. सायकलींगचा उपयोग करणारांचीही संख्या वाढत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कार व दुचाकीस्वारांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्यामुळे बहुतांश अपघात होत असून संबंधीतांवर ठोस कारवाईची मागणी होत आहे.
धूम स्टाईल शर्यती
पामबीच रोडवर रात्री ११ नंतर पहाटेपर्यंत धूम स्टाईल स्पोर्ट बाईकच्या शर्यती सुरू असतात. कानठळ्या बसविणारा आवाज करत १२० पेक्षा जास्त वेगाने या बाईक पळविल्या जात आहेत. कर्नकर्कश आवाजामुळे इतर वाहन चालकांचे लक्ष विचलीत होवून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
इंटेलच्या माजी अधिकाऱ्याचा मृत्यू
चेंबूर येथे राहणारे अवतार खुशाल सिंह सैनी व त्यांच्या सहकाऱ्यांचा सीएजीसी हा सायकल ग्रुप आहे. चेंबूर वरून ते खारघर पर्यंत सायकलींगचा व्यायाम करत असतात. २८ फेब्रुवारीला पहाटे सैनी व त्यांचे सहकारी पामबीच रोडवरून एक कडेने जात असताना मागून वेगाने आलेल्या कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने सैनी यांना डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले. सैनी हे इंटेलचे माजी अधिकारी होते. या प्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.