योगा न करता दिलीप देसलेंना वाहिनी श्रद्धांजली, नवीन पनवेल मधील देसलेंच्या योगा ग्रुपचे सदस्य झाले भावनिक
By वैभव गायकर | Updated: April 23, 2025 15:14 IST2025-04-23T15:13:19+5:302025-04-23T15:14:00+5:30
Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल मधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी ते निसर्ग टूरसोबत काश्मीर ला गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यात देसलेसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

योगा न करता दिलीप देसलेंना वाहिनी श्रद्धांजली, नवीन पनवेल मधील देसलेंच्या योगा ग्रुपचे सदस्य झाले भावनिक
- वैभव गायकर
पनवेल - काश्मीर खोऱ्यातील पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल मधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी ते निसर्ग टूरसोबत काश्मीर ला गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यात देसलेसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला. नवीन पनवेल मध्ये देसले यांच्यासह योगा ग्रुपच्या माध्यमातुन काही स्थानिक रहिवासी नियमित योग करतात.या घटनेबाबत बुधवारी पहाटे या योगा ग्रुपच्या सदस्यांना माहिती पडल्यावर त्यांनी योगा न करता दिलीप देसले यांना श्रद्धांजली वाहत या घटनेचा निषेध केला.
दिलीप देसले हे तुर्भे एमआयडीसी मधील लुब्रीझॉल कंपनी मधील निवृत्त वर्कर आहेत.त्यांना तीन मुले आहेत.तिघांपैकी एक मुलगा आणि मुलगी पुण्याला स्थायिक झाले आहेत तर एक मुलगी नवीन पनवेल मध्ये वास्तव्यास आहेत.अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे असलेले दिलीप देसले (67) हे मागील चार वर्षापासून सतत येथील योगा ग्रुप सोबत जोडलेले असल्याची माहिती बळीराम देशमुख यांनी दिली.2 जानेवारी मोठ्या उत्साहात केक कापुन या ग्रुपने देसले यांचा 67 वा वाढदिवस साजरा केला होता.त्यांनतर 2 एप्रिल रोजी देखील नवीन पनवेल सेक्टर 16 मधील सिडको गार्डन मध्ये योगा ग्रुपने एकत्रित योगा ग्रुपचा आठवा वर्धापन दिन साजरा केला.त्यावेळी देसले या उत्साहात सहभागी झाले होते.35 ते 40 सदस्य या ग्रुप सोबत जोडले आहेत.या ग्रुप मध्ये बहुतांशी जेष्ठ नागरिक असल्याने या जेष्ठ नागरिकांचा एकमेकांना वेगळा भावनिक आधार असतो.आपल्यापैकी एका सदस्यांचा अशा दुर्दैवी घटनेत अंत होतो यामुळे अनेकजणांना मोठा धक्का बसला आहे.
दिलीप देसले हे नवीन पनवेल प्लॉट नंबर 10 ,रस्ता क्रमांक 16, सेक्टर 12 याठिकाणी वास्तव्यास आहेत.तीनही मुलांचे लग्न झाल्याने ते आणि त्यांची पत्नी दोघे याठिकाणी वास्तव्यास आहेत.या घटनेमुळे शेजाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.घटनेची माहिती मिळताच शेजारी तसेच देसलेंच्या नातेवाईकांनी त्यांची घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले.
दिलीप देसले अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू असे व्यक्तिमत्व होते.मागील चार वर्षापासुन माझी त्यांच्याशी ओळख आहे.बुधवारी सकाळी मला या घटनाबाबत कळाले.त्यांची मुलगी कविताने देखील या घटनेबाबत मला सांगितले.आमच्यासाठी खरच दुःखाचा दिवस आहे.आम्ही आजचा दिवस योगाच्या ठिकाणी जाऊन योगा न करता त्यांना श्रद्धांजली वाहिली.
- बळीराम देशमुख (दिलीप देसले यांचे मित्र )