आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण
By Admin | Updated: January 6, 2015 22:14 IST2015-01-06T22:14:30+5:302015-01-06T22:14:30+5:30
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे.

आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण
हितेन नाईक ल्ल पालघर
समुद्रातील तेलसाठ्याचा शोध घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. मासेमारी बंदी कालावधीत होणाऱ्या नुकसानी व पुनर्वसनाबाबत शासनाने प्रथम पॅकेज जाहीर करावे नंतरच सर्वेक्षणाचा निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका कृती समितीसह मच्छीमार सहकारी संस्थांनी घेतली आहे.
देशाच्या विकासाच्या बाबत घेतलेल्या जनहित कार्यक्रमाला आजपर्यंत मच्छीमारांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. मागील काही वर्षापूर्वी ओएनजीसीने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु त्याबाबत अजूनही मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे सर्र्वेक्षणामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाईची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला मच्छीमार तयार नाहीत. या सर्र्वेेक्षणाच्या निर्णयाबाबत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या आदेशाने नेमलेल्या समन्वय समीतीत रामभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, लिओ कोलॅसो इ. मच्छीमार नेत्यांना समाविष्ट करण्यात आले होते. परंतु आजपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाच्या निर्णयाबाबत समन्वय समितीसह कुठल्याही मच्छीमार सहकारी संस्थाना विश्वासात घेतले गेले नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजप्रमाणे शासनाने मच्छीमारांसाठी पॅकेजची घोषणा करावी तसेच विरोध असतानाही समुद्रात सर्वेक्षण सुरू केल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसान व जीवीतहानीस शासन जबाबदार असल्याचे पत्र वडराई, केळवा, माहिम, टेंभीच्या मच्छीमार सहकारी संस्थांनी सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त, पालघर (ठाणे) यांना दिले आहे.
(वार्ताहर)
असे होते सर्वेक्षण :
४पालघर तालुक्यातील एडवण, केळवा, माहीम, टेंभी, वडराई या मच्छीमारी गावांपासून ४० ते ५० नॉटीकल मैल सागरी अंतराच्या भागात ओएनजीसी या तेल प्रकल्प कंपनीकडून ६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत समुद्रातील तेल साठ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान एका महाकाय बोटीच्या पाठीमागे अर्धा ते एक किलोमिटर अंतराच्या तारेला मोठी उपकरणे, फ्लाटस लावलेले असतात. ही बोट सर्वेक्षणासाठी सध्या एडवण ते वडराई दरम्यानच्या मच्छीमारी बोटी ज्या भागात मासेमारी करतात त्या भागामध्ये सर्वेक्षणासाठी फिरणार आहे. अशा वेळी समुद्रातील सर्वेक्षणाच्या इच्छीत स्थळी मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी आपल्या कवी (खुंटे) समुद्रात रोवले आहेत. एक कव मारण्यासाठी सध्या मच्छीमाराला २५ हजार ते १ लाख रू. पर्यंत खर्च येतो. त्याचे काय होणार?
४पालघर जिल्ह्णातील वसई तालुका ते पालघर तालुक्यातील मच्छीमारांनी समुद्रात ३ ते ४ हजार कवी मारल्या असून सुमारे १७ दिवस चालणाऱ्या सर्वेक्षणामुळे या कवींचे मोठे नुकसान होणार आहे. तर पारंपारीक दालदा, वागरा, शहेनशहा, मगरी इ. पद्धतीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची संख्याही मोठी असून समुद्राच्या पृष्ठभागावर टाकलेली जाळी सर्वेक्षण जहाजाच्या तारेच्या दोरखंडामध्ये अडकल्यास मच्छीमाराचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच या महाकाय जहाजाच्या आड एखादी मच्छीमार बोट आल्यास जीवीतहानीची शक्यताही निर्माण होऊ शकते.