पालिकेच्या विद्यार्थ्याला एक लाख शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:50 IST2017-07-31T00:50:35+5:302017-07-31T00:50:35+5:30
महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातील पालिका शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्तम बबरूवान कांबळे या विद्यार्थ्याला बॅडमिंटनसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

पालिकेच्या विद्यार्थ्याला एक लाख शिष्यवृत्ती
नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रभागातील पालिका शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी उत्तम बबरूवान कांबळे या विद्यार्थ्याला बॅडमिंटनसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. दिल्लीमधील त्यागराज स्टेडियममध्ये पूर्ण देशातून निवडलेल्या खेळाडूंसोबत तो विशेष प्रशिक्षण घेत आहे.
महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमधून चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी झोपडपट्टी परिसरातील त्यांच्या प्रभागामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय उभे केले आहे. खासगी शाळेपेक्षाही चांगली इमारत व परिसर या ठिकाणी असून शैक्षणिक गुणवत्तेवरही विशेष भर दिला आहे. यामुळेच शाळेतील विद्यार्थी खो-खो, लंगडी व इतर स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. अॅथलेटिक्समध्येही येथील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पीएनबी मेटलाइफ इन्श्युरन्स कंपनी आणि क्राय चाइल्ड राइट अॅण्ड यू यांच्या विद्यमाने व्यावसायिक बॅडमिंटन प्रशिक्षणाचे १२ प्रकल्प संपूर्ण भारतामध्ये तीन वर्षांपासून सुरू केले आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, रायपूर, चेन्नई, गुलबर्गा या ठिकाणी हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विद्यार्थी व पालकांमध्ये बॅडमिंटन खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जावे व या खेळाला सर्वमान्यता मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. २३१ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ खेळाडूंकडून मार्गदर्शन दिले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ६६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामधून ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीसाठी निवडण्यात आले होते. यामध्ये राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये सहावीमध्ये शिक्षण घेणाºया उत्तम बबरूवान कांबळे याची निवड करण्यात आली आहे. त्याला एक लाख रुपये शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
बॅडमिंटनच्या विशेष प्रशिक्षणासाठी उत्तम २८ जुलैलाच दिल्ली येथे रवाना झाला आहे. महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिलेल्या प्रोत्साहन व उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने व पालकांनी व्यक्त केली आहे. बॅडमिंटनचे प्रशिक्षण देणारे उमेश यादव, क्राय संस्थेचे आभा दुगल, कांचन यादव, अलका ढवळे,
मारुती गवळी, क्रीडा शिक्षक अमोल वाघमारे यांनीही या विद्यार्थ्याला घडविण्यासाठी विशेष मेहनत
घेतली आहे.