परराज्यातील डॉक्टरांच्या पदव्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 02:52 IST2016-02-11T02:52:05+5:302016-02-11T02:52:05+5:30

शहरात बिहार व इतर राज्यांतून पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरांची पोलिसांसह महापालिकेने झाडाझडती सुरू केली आहे. यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्यांनी व्यवसाय सुरूच ठेवला असेल, तर

Overseas Doctor's Degrees Flooding | परराज्यातील डॉक्टरांच्या पदव्यांची झाडाझडती

परराज्यातील डॉक्टरांच्या पदव्यांची झाडाझडती

नवी मुंबई : शहरात बिहार व इतर राज्यांतून पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरांची पोलिसांसह महापालिकेने झाडाझडती सुरू केली आहे. यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्यांनी व्यवसाय सुरूच ठेवला असेल, तर त्यांच्यावर पुन्हा गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
नेरूळमधील बोगस डॉक्टर दत्तात्रेय आगदे याच्यानंतर शांताराम आरोटे या बोगस डॉक्टरलाही पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईमध्ये यापूर्वी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही बोगस डॉक्टर शहरात बिनधास्तपणे दवाखाना चालवत आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. आगदेने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे एक वकिलाला जीव गमवावा लागला आहे. एक लहान मुलगा कायमस्वरूपी अपंग झाला आहे.
बोगस डॉक्टरांमुळे शहरवासीयांना असलेला धोका लक्षात घेऊन, परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी महापालिकेला पत्र देऊन शहरातील सर्व डॉक्टरांची विशेषत: परराज्यात पदवी घेतलेल्या डॉक्टरांच्या कागदपत्रांची छाननी करण्यास सूचविले आहे. यापूर्वी गुन्हे दाखल झालेले अनेक जण अद्याप दवाखाने चालवत आहेत. या सर्वांची तपासणी करून वेळ पडली, तर पुन्हा गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
बोगस डॉक्टर गावठाण व झोपडपट्टी परिसरात स्वत:चे दवाखाने चालवत आहेत. त्यांचे राजकीय कार्यकर्त्यांशी चांगले संबंध निर्माण करून, हा व्यवसाय बिनधास्तपणे करत आहेत. पोलीस पूर्ण शहरात झाडाझडती करणार आहेत. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
परराज्यातून पदवी मिळविलेल्यांची कागदपत्र संबंधित विद्यापीठांकडे पाठवून, खरोखर या सर्वांनी पदवी घेतली आहे का, याची तपासणी केली जात आहे. बिहारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पाच जणांनी पदवी घेतल्याचे समजल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली. आरोटेची पदवी बोगस असल्याचे स्पष्ट झाले, तर इतरांची पदवी खरी असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. याच पद्धतीने इतरांचीही माहिती संकलित केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आगदेनेच मिळवून दिली आरोटेला बोगस पदवी
पोलिसांनी अटक केलेला बोगस डॉक्टर शांताराम आरोटे याने बोगस डिग्रीविषयी दिलेली माहितीही धक्कादायक आहे. अ‍ॅड. उत्तम आंधळे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दत्तात्रेय आगदे या बोगस डॉक्टरानेच आरोटेलाही बिहारमधील विद्यापीठाची पदवी मिळवून दिली होती. बोगस पदवी मिळवून देण्यासाठी १२ वर्षांपूर्वी २० हजार रुपये घेतले होते, अशी माहिती दिली आहे. यामुळे आगदेविषयी संशय पुन्हा वाढला आहे.
बोगस पदवी मिळवून देण्याच्या रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजून किती जणांना त्यांनी ही डिग्री मिळवून दिली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. कुलकर्णी नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्तीने पदवी मिळविण्याचे व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

बोगस डॉक्टरने पत्रकार कोट्यातून मिळविले घर
शहरातील अनेक बोगस डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र वगळून, इतर संघटनांशीही संबंधित आहेत. काही जणांनी स्वत:च्या संरक्षणासाठी पत्रकार असल्याचे भासविण्यास सुरुवात केली आहे. साप्ताहिक व इतर दैनिकांची ओळखपत्र या डॉक्टरांकडे आहेत. खैरणे परिसरामध्ये दवाखाना चालविणाऱ्या एका बोगस डॉक्टरने पत्रकार कोट्यातून घर मिळविले आहे. सिडकोच्या स्वप्नपूर्तीमध्ये हे घर घेतल्याची माहिती समोर येत असल्याने, पुन्हा खळबळ उडाली आहे.

Web Title: Overseas Doctor's Degrees Flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.