गणेशोत्सवासाठी बाहेरचे ‘पोलीस’बळ

By Admin | Updated: September 1, 2016 03:19 IST2016-09-01T03:19:58+5:302016-09-01T03:19:58+5:30

कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महामार्ग पोलिसांनी इतर परिक्षेत्रातून अतिरिक्त कुमक मागवली आहे.

Outside 'Police' force for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी बाहेरचे ‘पोलीस’बळ

गणेशोत्सवासाठी बाहेरचे ‘पोलीस’बळ

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महामार्ग पोलिसांनी इतर परिक्षेत्रातून अतिरिक्त कुमक मागवली आहे. गुरुवारपासून बंदोबस्ताला सुरुवात होणार असून कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी बुधवारी रवाना झाले आहेत. वाहतूक कोंडी, अपघात होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली असल्याचे महामार्ग पोलिसांच्या पळस्पे केंद्रातून सांगण्यात आले.
गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण मानला जातो. यानिमित्ताने पाच ते सहा लाख कोकणवासीय आपल्या मूळ गावी जातात. नोकरी- व्यवसायानिमित्त मूळचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील असलेले पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई शहर आणि उपनगरात स्थायिक झालेले आहेत. यापैकी बहुतांशी जण आपल्या कोकणातील घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. रेल्वेबरोबरच एसटी आणि खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात जातात. गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा याकरिता प्रशासन विशेष खबरदारी घेते. त्याचबरोबर गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोकणवासीय वेळेत पोहचावे याकरिता वाहतूक विभाग दक्ष असतो.
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत महामार्ग पोलिसांची हद्द येते. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस गोवा महामार्गावर लाखो वाहने कोकणाकडे जातात. त्यावेळी वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांवर असते. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही बाहेरच्या परिक्षेत्रातून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. पुणे, नागपूर, नाशिक परिक्षेत्रातून महामार्ग पोलिसांची कुमक मुंबई-गोवा महामार्गावर मागविण्यात आली आहे. मंगळवार आणि बुधवारी पळस्पे केंद्रावर बाहेरचे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. त्यांना बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांना बंदोबस्ताबाबत प्राथमिक प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले. त्याचबरोबर खाजगी क्रे न आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली आहे. १ ते १६ सप्टेंबरपर्यंत हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परतीचा प्रवास सुध्दा सुखकर व्हावा याकरिता पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Outside 'Police' force for Ganeshotsav