२४ वर्षांची बेशिस्त २० दिवसांत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 02:20 IST2016-05-22T02:20:30+5:302016-05-22T02:20:30+5:30

महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये २४ वर्ष सातत्याने वाढत असलेला बेशिस्तपणा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० दिवसांमध्ये मोडीत काढला आहे.

Out of the 24-year-old unconditional 20 days | २४ वर्षांची बेशिस्त २० दिवसांत संपली

२४ वर्षांची बेशिस्त २० दिवसांत संपली

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये २४ वर्ष सातत्याने वाढत असलेला बेशिस्तपणा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २० दिवसांमध्ये मोडीत काढला आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर राहू लागले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाची नोंद (वर्कशीट)ठेवणे बंधनकारक केले आहे. आयुक्तांच्या करड्या शिस्तीमुळे लोकाभिमुख कामकाज सुरू झाले असून शहरवासीयांनी आयुक्तांच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी, घनकचरा, मलनिस:रण, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये राज्य व केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतू यानंतरही माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये आपण पुरस्कारासाठी पात्र आहोत का हे तपासून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. शहरातील फेरीवाले व अतिक्रमणांना काही अधिकारी व कर्मचारी पाठीशी घालत असल्याचेही वक्तव्य केले होते. नाईक यांनी स्वत: वाशीमध्ये फिरून फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. परंतू मागील २४ वर्षात सातत्याने पालिकेच्या कामकाजामधील बेशीस्तपणा वाढत गेला आहे. अधिकारी व कर्मचारी एकमेकांविरोधात षडयंत्र रचत असल्याचे पहावयास मिळत होते. प्रशासनावर कोणाचाच धाक उरला नव्हता. परंतू तुुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती होताच २० दिवसामध्ये महापालिकेमधील बेशीस्त थांबली आहे. २ मे रोजी पदभार स्विकारन्यापुर्वी मालमत्ता कर, लेखा विभागात जावून तेथील कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. जागेवर नसलेल्या कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती लावण्याचे आदेश दिले. पहिल्याच झटक्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धारेवर धरल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. ३ मे पासून महापालिका मुख्यालय व सर्वच कार्यालयांमधील कर्मचारी वेळेत कामावर हजर होऊ लागले आहेत. लेटलतीफ कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती वाटू लागली आहे. दुपारी एक ते दीड तास कर्मचारी जेवणाची सुट्टी घेत होते. जेवण झाले की अनेक जण शतपावली करण्यासाठी बाहेर जात होते. परंतू आता अर्धा तासामध्ये जेवण संपवून कर्मचारी जागेवर येवून बसत आहेत.
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ड्रेसकोडचा वापर करावा, रोज ओळखपत्र लावलेच पाहिजे याविषयी परिपत्रके काढूनही अंमलबजावणी होत नव्हती. परंतू आता सर्वच्या सर्व कर्मचारी ओळखपत्र लावूनच कार्यालयात येत आहेत. दिघा परिसरातील दौऱ्याप्रसंगी उप स्वच्छता अधिकाऱ्यावर कारवाई केल्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दिघा मधील रस्ता रूंदीकरणाचा ८ वर्षांपासून रखडलेला प्रश्न मुंढे यांनी पहिल्या ८ दिवसामध्ये सोडविला. अतिक्रमणे हटविण्यात आल्याने रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नागरिकांची कामे वेळेत होवू लागली आहेत. अधिकारी व कर्मचारी सहज उपलब्ध होऊ लागले असल्यामुळे नागरिकांनीही आयुक्तांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी समाधान केले आहे.
पदभार स्विकारण्यापुर्वीच लेखा, मालमत्ताकर व अतिक्रमण विभागाची झाडाझडती
लेखा विभागातील जागेवर नसलेल्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थीती लावण्याचे आदेश
कर थकबाकीदारांचे लाड न करण्याचे मालमत्ता कर विभागाला आदेश
कायद्याच्या चौकटीत राहूनच कामकाज करण्याची घोषणा
टाईमबाँडच्या आदेशाने कर्मचारी वेळेत हजर राहण्यास सुरवात
जेवणासाठी फक्त अर्धा तास सुट्टी
प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ओळखपत्राचा वापर सुरू
प्रत्येक कामगारांना दिवसभरातील कामाची वर्कशीट बंधनकारक
उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थीती लावण्याचे आदेश
दिघा कार्यालयातील अनुपस्थीत कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली
८ वर्ष रखडलेला दिघा येथील रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न ८ दिवसात मार्गी
अनधिकृत नळजोडण्यावर कारवाई सुरू

Web Title: Out of the 24-year-old unconditional 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.