मृत्यूच्या दारातून आमची मुले परत आली...
By Admin | Updated: December 9, 2015 01:00 IST2015-12-09T01:00:23+5:302015-12-09T01:00:23+5:30
शाळेत जाण्याच्या वयात मुलांना हृदयरोग झाला. त्यांच्या आजाराच्या वेदना आम्हालाच जास्त होत होत्या. मोलमजूरी करून दोन वेळची भाकर मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती

मृत्यूच्या दारातून आमची मुले परत आली...
नवी मुंबई : शाळेत जाण्याच्या वयात मुलांना हृदयरोग झाला. त्यांच्या आजाराच्या वेदना आम्हालाच जास्त होत होत्या. मोलमजूरी करून दोन वेळची भाकर मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती. उपचारासाठी लाखो रुपये कुठून आणायचे. आम्ही साऱ्या आशा सोडून दिल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय देवासारखे धावून आले व मोफत उपचार सुरू करून मुलांना मृत्यूच्या दारातून परत आणल्याच्या भावना सांगली जिल्ह्यातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या वतीने ६५ मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या मुलांचा उपचाराचा व पालकांच्या राहण्याचा पूर्ण खर्च रुग्णालयाने उचलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रुग्णालयात येऊन मुलांची आस्थेने चौकशी केली.
सांगली जिल्ह्यामधील दुष्काळी स्थिती असणाऱ्या खेड्यांमध्ये लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. शाळांमध्ये झालेल्या आरोग्य तपासणीमधून ६५ मुलांना हृदयाचे गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले. खाजगी रुग्णालयांमध्ये मुलांची शस्त्रक्रिया करण्यासाठी २ ते ४ लाख रुपये खर्च सांगितला जात होता.
या मुलांच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडीसेविका व गावात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला आधार दिला. आमची कैफियत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला विनंती करून पूर्णपणे मोफत उपचार सुरू केले. तासगाव तालुक्यातील छोट्या खेड्यात राहणाऱ्या चार वर्षांच्या ज्ञानेश्वरचे आजोबा मारुती मोरे यांनी सांगितले की एवढ्या छोट्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्हाला धक्का बसला. परंतु मुख्यमंत्र्यांनी व रुग्णालयाच्या सहकार्याने आमच्या मुलावरील उपचार मार्गी लागले. अण्णासाहेब श्रीराम हा मिरज तालुक्यातील ८ वर्षांचा मुलगा. त्याचे चुलते प्रकाश श्रीराम त्याला घेऊन नेरूळच्या रुग्णालयात आले आहेत. आम्हाला विश्वास बसत नाही की आमच्या मुलांवर उपचार होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे व आम्हाला येथे येण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या मुलांसाठी स्वतंत्र वार्ड तयार केला असून, नातेवाइकांच्या राहण्याचीही व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)