‘लोहरी द रात’चे आयोजन
By Admin | Updated: January 12, 2017 06:20 IST2017-01-12T06:20:27+5:302017-01-12T06:20:27+5:30
ईशान्य भारतातील ‘लोहरी’ हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

‘लोहरी द रात’चे आयोजन
नवी मुंबई : ईशान्य भारतातील ‘लोहरी’ हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात नवी मुंबईकरांनाही सहभागी होता येणार आहे. नवी मुंबई पंजाबी असोसिएशनने येत्या शुक्रवारी ‘लोहरी द रात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नेरूळ जिमखान्यात हा कार्यक्रम होणार आहे. ‘लोकमत’ हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. यात पंजाबी खाद्य संस्कृती, सरसो का साग, मक्की की रोटी, कुलचा, छोले, गाजर का हलवा आदींचा आस्वाद घेण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमांतर्गत विविध पारंपरिक संगीत व नृत्याची लयलूट असणार आहे. या कार्यक्रमाचा नवी मुंबईकरांनी पुरेपूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)