रायगड किल्ल्यावर महोत्सवाचे आयोजन
By Admin | Updated: December 9, 2015 00:56 IST2015-12-09T00:56:08+5:302015-12-09T00:56:08+5:30
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामार्फत ८ ते १२ जानेवारी २०१६ ला रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

रायगड किल्ल्यावर महोत्सवाचे आयोजन
अलिबाग : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामार्फत ८ ते १२ जानेवारी २०१६ ला रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रायगडावर हजारोंच्या संख्येने गर्दी होणार असल्याने या गर्दीचे आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करणे जिल्हा प्रशासनापुढे आव्हान ठरणार आहे. त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत हा महोत्सव पार पाडणे हे सुध्दा प्रशासनासाठी जिकिरीचे ठरणार आहे. याबाबतची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायक इतिहास सर्वांना माहिती व्हावा आणि पर्यटनवृध्दी होण्यासाठी रायगड महोत्सव १६ चे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने पर्यटक यामध्ये सामील व्हावे यासाठी १५ डिसेंबरला सांस्कृतिक विभाग एका वेबसाईटचे प्रकाशन करणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सशुल्क नोंदणी करुन या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. रायगडावर १५ हजार आणि पाचाड येथील २५ हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. जिजामाता राजवाड्याजवळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सलग चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन ८ जानेवारीला दुपारनंतर होणार आहे. ९ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग जिवंत करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिजामाता वाड्याजवळ राजमहल उभारण्यात येणार असून त्या काळातील बाजारपेठही तेथे निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. (प्रतिनिधी)