नवी मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच ढोलताशा पथकांच्या वतीने शिवरायांना मानाची वंदना दिली जाणार आहे. सीबीडीत ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानाचा मुजरा केला जाणार आहे. या परिसरात भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून शिवकार्याच्या आठवणी जाग्या केल्या जाणार आहेत. नेरूळ सेक्टर ४२ परिसरातील सीवूड्सचा राजा चौक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जलजागृती अभियानांतर्गत पाणी वाचविण्याबाबतच्या सूचना आणि संकल्पना मांडणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्यमातून जलबचतीचा मोलाचा संदेश दिला जाणार आहे. शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान आणि उपविभाग प्रमुख राजेंद्र मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तुर्भे परिसरातील अपंग व गरजू व्यक्तींना आवश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक भान जपून शिवजयंती साजरी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 02:25 IST