अवयवदानाविषयी जनजागृती रॅली
By Admin | Updated: October 3, 2015 02:35 IST2015-10-03T02:35:57+5:302015-10-03T02:35:57+5:30
नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटावे याकरिता लोकमत माध्यम प्रायोजक आयोजित फोर्टीज रुग्णालय, वाशी आणि लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या संयुक्त

अवयवदानाविषयी जनजागृती रॅली
नवी मुंबई : नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटावे याकरिता लोकमत माध्यम प्रायोजक आयोजित फोर्टीज रुग्णालय, वाशी आणि लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी वाशी येथे झालेल्या रॅलीमध्ये ५०००हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले, बाईकर्स, सायकलस्वार, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजसेवक आणि फोर्टीज रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी, लायन्स क्लबचे विविध विभागीय सदस्य सहभागी झाले होते. वाशी सेंटर वन मॉलपासून सुरु झालेली या रॅलीचा वाशीतील सेक्टर १० परिसरात समारोप करण्यात आला.
शरीरातील प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा असतो आणि त्याशिवाय जगणे किती अवघड आहे हे नागरिकांना पटवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये अवयवदानासंबंधी जनजागृती करण्यात आली. लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या जनजागृती रॅलीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी, मुंबई डबावाला एज्युकेशन सेंटर तसेच मानसरोवर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज, कामोठे, पिल्लई कॉलेज आॅफ आर्ट्स,कॉमर्स अॅण्ड सायन्स, घणसोली येथील टिळक एज्युकेशन सोसायटी आदींचा सहभाग होता. या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून लेक वाचवा, पाणी वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्वच्छ भारत, रक्तदान करा, डोळे दान करा असे अनेक संदेश देऊन समाजप्रबोधनाचेही उत्तम काम या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. तरुणांनी सायकल, बाईक या वाहनांचा वापर करुन संदेश फलकातून जनजागृती केली.