निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती

By Admin | Updated: October 5, 2015 01:01 IST2015-10-05T01:01:17+5:302015-10-05T01:01:17+5:30

गणेशोत्सव काळात शहरातल्या विसर्जन केंद्रावर एकूण ७३ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले आहे. त्यापासून ३० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे

Organic fertilizer production from the production | निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती

निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
गणेशोत्सव काळात शहरातल्या विसर्जन केंद्रावर एकूण ७३ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले आहे. त्यापासून ३० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे निर्माल्याचे पावित्र्य राखत ते उपयोगी आणले जाणार आहे.
१गणेशोत्सव काळात शहरातील विसर्जन केंद्रावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होत असते. या निर्माल्यासोबत नागरिकांच्या भावना जडलेल्या असल्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे गरजेचे असते. यामुळे प्रतिवर्षी जमा होणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न प्रशासनापुढे असतो. अनेकदा गणेशमूर्तीचे विसर्जन करताना सोबत आणलेले हार, फुले असे निर्माल्य भाविक पाण्यात टाकतात. यामुळे तलावांचे जलप्रदूषण होत असते. हे जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेतर्फे सर्वच विसर्जन केंद्रावर निर्माल्य कलश ठेवण्यात येतात. त्यामध्ये जमा झालेले निर्माल्य बंद वाहनातून वाहतूक करुन योग्य ठिकाणी साठवले जाते. यंदा गणेशोत्सव काळात दहा दिवसात सुमारे ३३ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
२एकूण २३ केंद्रांवर झालेल्या विसर्जनादरम्यान पालिकेने ७३ मॅट्रिक टन निर्माल्य जमा केले आहे. हे निर्माल्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ८ बंदिस्त कॉम्पॅक्टर व १२ छोट्या बंदिस्त टिप्परद्वारे एकत्रित करुन त्याची साठवण करण्यात आली आहे. यंदा प्रथमच हे निर्माल्य उपयोगी आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुर्भेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी स्वतंत्र प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आले आहे. तिथे निर्माल्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जात आहे. त्याद्वारे ३० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती होईल असे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांनी सांगितले. खतनिर्मितीसाठी २८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. महापालिकेतर्फे प्रथमच निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला जात आहे. हे सेंद्रिय खत उद्यान विभागामार्फत पालिकेच्या उद्यानात वापरले जाणार आहे.
------------
सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती
अरुणकुमार मेहत्रे ल्ल कळंबोली
नवीन पनवेलकरांना घनकचरा व्यवस्थापनाबाबत जागृत करण्याकरिता सिडको, मिटकॉनने पुढाकार घेतला आहेच. त्यांच्या सोबतीला आता लोकप्रतिनिधीही सहभाग नोंदवू लागले आहेत. त्यामध्ये नगरसेवक गणेश कडू यांनी कचरामुक्त प्रभाग हा संकल्प केला आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. वर्षभरात हे अभियान यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. इतर वसाहतीप्रमाणेच नवीन पनवेलमध्ये मोठया प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. या नोडमध्ये जवळपास ८० टन कचरा रोज तयार होते. सिडको हा कचरा उचलून चाळ येथील क्षेपणभूमीवर टाकते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न सिडकोसमोर आहे.
मुंबई, ठाणे या महानगरातील कचऱ्याचा प्रश्न सिडको वसाहतींना भविष्यात भेडसावणार आहे. त्यामुळे सिडकोने मिटकॉनच्या साह्याने काही उपक्र म हाती घेतले आहे. रहिवाशांमध्ये एक प्रकारे जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. शाळा, ज्येष्ठ नागरिक संघ, सोसायट्यांमध्ये जावून घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
अभियानात नवीन पनवेलचे नगरसेवक गणेश कडू यांनी सहभाग नोंदवला आहे. सिध्दिविनायक सोशल क्लबच्या माध्यमातून कचरामुक्त प्रभाग हे अभियान त्यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. गौरा गणेशोत्सवात त्यांनी याबाबत माहितीपर पोस्टर लावले होते. त्याचबरोबर कंपोस्ट खतनिर्मिती कशी करता येते याबाबत स्वत: प्रात्यक्षिकासह माहिती भाविकांना देत होते. याकरिता त्यांनी बास्केट तयार करून घेतली आहे. बायो क्लचरमुळे त्याला दुर्गंधी येत नसल्याचे त्यांनी सर्वांना दाखवून दिले.
अशा प्रकारे घराघरात त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये प्रकल्प राबवला गेला तर फारसा कचरा उरणार नाही असे मत गणेश कडू यांनी व्यक्त केले. सोसायट्यांना बास्केट दिले जाणार असून त्यांनी तयार केलेले कंपोस्ट खत एजन्सीला देवून त्यातून उत्पन्नाचे साधन सुध्दा तयार निर्माण करून दिले जाणार आहे.
प्रभागात शंभरपेक्षा
जास्त सोसायट्या
रेल्वेस्थानकालगत असलेल्या या प्रभागात सेक्टर १३, १४, १५,१५ ए,१६ व पोदीमधील काही भाग येतो. सुमारे १०० पेक्षा जास्त सोसायट्या असून तीन हजार सदनिका आहेत. त्यामध्ये तीस हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. या विभागातून पाच ते सहा टन कचरा निर्माण होत आहे. त्याचे व्यवस्थापन कंपोस्ट खत़निर्मिती करून जागच्या जागी करण्याचा संकल्प सिध्दिविनायक सोशल संस्थेने केला आहे.
भंगार व्यावसायिकांनाही सामावून घेणार
या संदर्भात कडू यांनी या भागातील सगळ्या भंगार व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यांनी या सर्व सोसायटीतील रहिवाशांनी जमा केलेला हिरवा कचरा वगळता इतर कचरा हातगाडीने उचलून आणण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो वर्गीकरण करून जी काही रक्कम येईल ती त्यांनीच घ्यायचा प्रस्ताव ठेवला. सगळ्यांनी या गोष्टीला सकारात्मकता दर्शवली आहे.

Web Title: Organic fertilizer production from the production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.