...तरच अजित पवार-तटकरेंवर गुन्हे
By Admin | Updated: September 1, 2015 04:23 IST2015-09-01T04:23:32+5:302015-09-01T04:23:32+5:30
सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल होतील का,

...तरच अजित पवार-तटकरेंवर गुन्हे
ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल होतील का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली.
जलसंपदा विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या धरणांच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी आल्यानंतर शासनानेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची चौकशी करण्यास लाचलुचपत विभागाला सांगितले. त्यानुसार, ठाणे लाचलुचपत विभागामार्फत विशेष चौकशीस सुरुवात केली. त्यानुसार बाळगंगा, काळू आणि कोंडाणा या धरणांबाबत चौकशीला सुरुवात झाली आहे. मागील सहा ते सात महिन्यांच्या चौकशीनंतर पहिला गुन्हा मंगळवारी ठाण्यात दाखल झाला. बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. त्या वेळी शासकीय अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांकडे करोडोंचे घबाड असल्याचे समोर आले आहे.
तर, दोघांना अटक झाली आहे. अटकेतील कंत्राटदार निसार खत्री हा अजित पवारांच्या जवळचा असल्याचे बोलले जात असल्याने त्याला १२ प्रकल्पांची कामे मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळगंगा आणि काळू प्रकल्पाच्या वेळी अजित पवार आणि कोंडाणा प्रकल्पाचा वेळी सुनील तटकरे हे दोघे जलसंपदामंत्री होते. त्याच अनुषंगाने या दोघांना लाचलुचपत विभागाकडून या गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण उत्तरेही दिलेली नाही.
याचदरम्यान, त्यांनाही ठाण्यात चौकशीसाठी वेगवेगळे बोलावण्यात आले होते. मात्र, दोघांनी चौकशीस दांडीच मारली. याचदरम्यान, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर जर शासनाने ठरवले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर लोकमतला दिली. शासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यास दुसऱ्या चौकशीचा पाश लवकरच आवळला जाणार आहे. त्यांच्या घरझडतीत सापडलेली संपत्ती त्यांना मिळणाऱ्या पगारातून ते खरेदी करू शकत होते का, याची वेगळी तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)