लोकशाही दिनाचा केवळ फार्स
By Admin | Updated: December 8, 2015 00:58 IST2015-12-08T00:58:19+5:302015-12-08T00:58:19+5:30
लोकशाही दिनात ६ जुलै २०१५ ला महाड तालुक्यातील खर्डी गावातील महाड कृषी अधिकारी आणि वनराई संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पाणलोट विकासकामांतील २५ लाख

लोकशाही दिनाचा केवळ फार्स
जयंत धुळप, ल्ल अलिबाग
लोकशाही दिनात ६ जुलै २०१५ ला महाड तालुक्यातील खर्डी गावातील महाड कृषी अधिकारी आणि वनराई संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पाणलोट विकासकामांतील २५ लाख ४६ हजार ९८३ रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी दाखल तक्रार अर्जाची चौकशी एका महिन्यात पूर्ण करा व तक्रारदार शेतकरी संदेश उदय महाडिक यांना समुचित उत्तर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व माहिती केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक के. बी. तरकसे यांनी चार महिने उलटले तरी कार्यवाही केली नसल्याने, जिल्हा लोकशाही दिन हा केवळ एक फार्स आहे काय? असा प्रश्न या प्रकरणातील तक्रारदार व भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शेतकरी संदेश उदय महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला आहे.
चार महिने झाले तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा पाणलोट कक्ष व माहिती केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक के.बी. तरकसे यांच्याकडून होणे अपेक्षित असणारी चौकशी व त्यापुढील संबंधित कार्यवाही झाली नसल्याने, याबाबत विचारणा करण्याकरिता सोमवारच्या लोकशाही दिनात संदेश उदय महाडिक आले असता त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे महाडिक यांनी सांगितले. याबाबत महाडिक यांनी सोमवारीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत तक्रार दाखल केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही दिनात पुरावे सादर करुनही मला न्याय मिळाला नाही. कृपया या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन माझ्या सारख्या गरीब शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा, अशी विनंती महाडिक यांनी या अर्जात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होवू शकले नाहीत.