भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणखी एक पाऊल

By Admin | Updated: February 19, 2016 02:34 IST2016-02-19T02:34:04+5:302016-02-19T02:34:04+5:30

सिडकोने मागील दोन अडीच वर्षात पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला आहे. याअगोदर २१ कलमी कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे

One more step to eradicate corruption | भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणखी एक पाऊल

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणखी एक पाऊल

नवी मुंबई : सिडकोने मागील दोन अडीच वर्षात पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला आहे. याअगोदर २१ कलमी कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया या बिगर शासकीय कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सिडकोतील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. परंतु सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संजय भाटिया यांनी सर्वप्रथम भ्रष्टाचार निर्मूलनावर भर दिला. त्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनीही या कामात त्यांना मोलाची साथ दिली. सिडकोच्या इतिहासात प्रथमच पोलीस महाअधीक्षक दर्जाच्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देणारा २१ कलमी कार्यक्रम राबविण्यात आला. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या दोन अडीच वर्षात सिडकोतील भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसू शकला आहे. असे असले तरी पारदर्शक व भ्रष्टाचारविरहित कारभाराचा सिडकोने ध्यास घेतला आहे. त्यानुसार ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल कंपनीबरोबर सिडकोने सामंजस्य करार केला आहे. मेक इन इंडिया या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. ही संस्था सिडकोतील कर्मचारी, ठेकेदावर तसेच पुरवठादारांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. तसेच निविदेनुसार कामे पूर्ण होतात की नाही, कामाचा दर्जा, पाच कोटींच्या वरील खर्चाच्या प्रकल्पावर ही संस्था विशेष लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी ही संस्था सर्व्हे करून भ्रष्टाचार किती कमी झाला याचे विश्लेषण करणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांवर होणाऱ्या अनिर्बंध खर्चाला आळा बसून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: One more step to eradicate corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.