शतकोत्तर परंपरा जपणारी मुंबापुरीतील जुनी मंडळे
By Admin | Updated: September 21, 2015 03:08 IST2015-09-21T03:08:32+5:302015-09-21T03:08:32+5:30
बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़

शतकोत्तर परंपरा जपणारी मुंबापुरीतील जुनी मंडळे
बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़ आपला बाप्पा वेगळा उठून दिसावा म्हणून बाप्पा उंचच उंच होत गेला. भक्तांच्या मनोरंजनाच्या बरोबरीने त्यांना ज्ञान मिळावे यासाठी चलतचित्र, देखाव्यांची स्पर्धा सुरू झाली. काळानुरूप गणेशोत्सव बदलत गेला. नव्या पिढीसमोर आलेल्या गणेशोत्सवात सात्विक, धार्मिक भाव कुठेतरी लुप्त होताना दिसू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्याचा विसर पडतोय का, असा प्रश्न पडू शकतो. पण गिरगावातील जुनी मंडळे ज्या सार्वजनिक मंडळांनी शंभरी पार केली आहे, ती गणेशोत्सव मंडळे अजूनही पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करतात.
केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव
गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळक यांनी पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईक चाळ’ हे मंडळ गणपतीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ््याची मिरवणूक पालखीतून काढतात. या मिरवणुकीत वाडीतील रहिवासीच ढोल वाजवतात. लेजीमपथकही वाडीतील रहिवाशांचे आहे. पालखी धरणारे अनवाणी येतात़ प्रत्येक पुरुष टोपी घालूनच मिरवणुकीत सहभागी होतो. गणपतीचे पावित्र्य जपण्यासाठी देव्हाऱ्यात प्रवेश करताना अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. कीर्तन असते. एकादशीच्या दिवशी अखंड नामस्मरण केले जाते़ प्रत्येक घराला एक तासाचा वेळ दिला जातो, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक दिनेश जोशी यांनी दिली.
जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ठाकूद्वार येथील जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश याग, सहस्त्रावर्तने केली जातात. वाडीतील जुने रहिवासी अनंत चतुर्दशीला आवर्जून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या मंडळात पूजेसाठी एका छोट्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर दुसरी गणेशमूर्ती विविध रूपांत साकारली जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ, कॅडबरी, बॉल बेरिंगचे बॉल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा वापर करून या मंडळातील कार्यकर्तेच गणेशमूर्ती साकारायचे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंगेश पिटकर यांनी दिली.
धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ
या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आगमन पालखीतून होते. एक वर्ष कीर्तन आणि एक वर्ष भजनाचे आयोजन केले जाते. सध्याच्या जीवनशैलीमध्ये कोणालाही वेळ नसतो. नोकरीच्या अनिश्चित वेळामुळे एकत्र भेटता येत नाही. अशावेळी गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळी एकत्र येतात. यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंडळातील मुलांवर विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही तिसरी किंवा चौथी पिढी आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपली जाते. उत्सवात कोणत्याही प्रकारचा अतिरेक केलेला नाही, असे मंडळाचे पदाधिकारी सदानंद खेडेकर यांनी सांगितले.
आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गेल्या १०० वर्षांपासून मूर्तीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक या तीनही गोष्टींचा समावेश आहे. लहान मुलांना, तरुणांना उत्सवात सामाजिक कार्याचे बाळकडू दिले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिली.