पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:58 IST2016-03-04T01:58:18+5:302016-03-04T01:58:18+5:30

राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल नगरपालिकेचा कारभार अद्याप हायटेक झालेला नाही. नगरपालिकेच्या संकेतस्थळावर सभापतींची चुकीची नावे देण्यात आली आहे

Old information on Panvel's website | पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती

पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती

नवी मुंबई : राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल नगरपालिकेचा कारभार अद्याप हायटेक झालेला नाही. नगरपालिकेच्या संकेतस्थळावर सभापतींची चुकीची नावे देण्यात आली आहेत. शहर व मनपाविषयी अपुरी माहिती असल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
पनवेल नगरपालिकेची स्थापना १ सप्टेंबर १८५२ ला झाली. पालिकेला जवळपास १६४ वर्षे झाल्यानंतरही येथील कारभार अद्याप काळानुसार बदलला नाही. भविष्यात हे शहर देशातील सर्वात प्रमुख शहर असणार आहे. विमानतळ, नैना, बाजूला असणारे जेएनपीटी यामुळे राज्यातील सर्वात जास्त गुंतवणूक येथे होत आहे. पनवेल महानगरपालिका करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. राज्यातील अ वर्ग दर्जाच्या या पालिकेचे संकेतस्थळ मात्र अद्याप सुधारलेले नाही. जगभरातील नागरिकांना पालिकेच्या कामांची व येथील पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह विकास कामांची माहिती व्हावी म्हणून संकेतस्थळ तयार केले आहे. परंतु पदाधिकारी बदलल्यानंतर तेथील माहिती बदलली जात नाही. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सीता पाटील असताना संकेतस्थळावर अद्याप संगीता कांडपाळ यांच्याच नावाचा उल्लेख आहे. नियोजन व विकास समिती, शिक्षण व क्रीडा, आरोग्य. पाणीपुरवठा व जलनिस्सारणसह बांधकाम समिती सभापतींचीही चुकीची नावे देण्यात आली आहेत.
नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर आॅन गोर्इंग प्रोजेक्ट, फॅक्ट शिट, लोकोपयोगी सेवा, पर्यटन, क्षेत्र आणि प्रभाग याविषयी माहितीचे हेड तयार केले आहेत. परंतु यामध्ये कोणतीच माहिती दिलेली नाही. नगरपालिकेविषयी अत्यंत त्रोटक माहिती दिली असल्यामुळे शहराची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी संकेतस्थळाला भेट देणाऱ्या नागरिकांची निराशा होत आहे. याशिवाय शहराविषयी चुकीची माहिती जात आहे. माहितीचा अधिकार या शीर्षकाखाली नगरपालिकेच्या सभासदांची दिलेली माहितीही चुकीची आहे. गतवर्षीच्या सभापतींचीच नावे याठिकाणी आहे. प्रशासन संकेतस्थळावरील माहितीमध्ये कधी सुधारणा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Old information on Panvel's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.