‘ओके गो’ अन् ओटीपी देशाबाहेर; सायबर गुन्ह्यांना वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा आधार, ८ जणांना अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 6, 2025 12:25 IST2025-11-06T12:25:08+5:302025-11-06T12:25:34+5:30
मागील पाच वर्षांत सायबर गुन्हेगारी पद्धतीत आश्चर्यकारक बदल झाले आहेत

‘ओके गो’ अन् ओटीपी देशाबाहेर; सायबर गुन्ह्यांना वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा आधार, ८ जणांना अटक
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ट्रेडिंगच्या बहाण्याने ऑनलाईन आर्थिक फसवणूक वाढत असून, त्यात त्रयस्थ व्यक्तींची बँक खाती वापरली जात आहेत. या बँक खात्यांशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरचे ओटीपी थेट गुन्हेगारांपर्यंत विशिष्ट ओके गाे या ॲप्लिकेशनद्वारे पोहोचविले जात आहेत. यामुळे गुन्हेगारांना संबंधित मोबाईल नंबरचा वापर न करतानाही बँकेतील रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवणे शक्य होत आहे. शिवाय संवादासाठीही वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर होताना दिसत आहे.
मागील पाच वर्षांत सायबर गुन्हेगारी पद्धतीत आश्चर्यकारक बदल झाले आहेत. आजवर संगणक, मोबाईल, संकेतस्थळ हॅक करून गुन्हे केले जायचे. मात्र सध्या नागरिकांना प्रलोभनाचे बळी पाडून सायबर गुन्हेगार त्यांचे खाते भरत आहेत. मात्र, या साखळीतील खालचेच मोहरे पोलिसांच्या हाती लागत असून, देशभरात किंवा देशाबाहेर असलेले सूत्रधार मात्र कायम पडद्याआडच राहिले आहेत. त्यांच्याकडून केवळ वेगवेगळ्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सर्व सूत्रे हलवली जात असल्याचे समोर आले आहे.
सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाते पुरवणाऱ्या ८ जणांना अटक केली आहे. ते चीन, कंबोडिया येथील व्यक्तींसोबत टेलिग्राम, ओके गो, एसएमएस अँड सेंडर या इतर ॲप्लिकेशनचा आराेपींकडून वापर सुरू हाेता.
मुख्य सूत्रधार मोकाटच
बहुतांश सायबर गुन्ह्यांमध्ये ओके गो या ॲप्लिकेशनचा वापर दिसून आल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरमधून ते काढून टाकले आहे. त्यानंतरही अनेक जण व्हीपीएनच्या आधारे त्याचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून पोलिसांच्या एक पाऊल पुढे राहण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न उघड दिसून येत आहे. यामुळेच देशभरात धुडगूस घातलेल्या सायबर गुन्ह्यांच्या सूत्रधारांपर्यंत देशभरातील पोलिस पोहचू शकलेले नाहीत.
पैशांची फिरवाफिरव
पकडलेल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन असून, त्यांच्या मोबाईलमध्ये गुन्ह्यातील बँक खात्यांना जोडलेले सीमकार्ड होते. देशाबाहेर बसलेल्या गुन्हेगाराने त्या बँक खात्याचा व्यवहार केल्यास या आठ जणांच्या मोबाईलवर ओटीपी यायचे. मात्र ओके गो ॲप्लिकेशनद्वारे ते ओटीपी थेट देशाबाहेर बसलेल्या सूत्रधाराला मिळायचे. यामुळे पैशांची फिरवाफिरव त्यांना सहज शक्य होती.