आयुक्तांच्या कार्यशैलीने सत्ताधारी बॅकफूटवर
By Admin | Updated: June 15, 2016 01:38 IST2016-06-15T01:38:25+5:302016-06-15T01:38:25+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आक्रमक कार्यपध्दतीने कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडविली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचा सत्ताधारी

आयुक्तांच्या कार्यशैलीने सत्ताधारी बॅकफूटवर
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आक्रमक कार्यपध्दतीने कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडविली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचा सत्ताधारी राष्ट्रवादीनेही धसका घेतला आहे. एनएमएमटीच्या घणसोली डेपोचे उद्घाटन आणि हायब्रिड बसचा शुभारंभ करताना राष्ट्रवादीचे नेते पूर्णत: बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एनएमएमटीच्या घणसोली डेपोचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्याचे योजिले होते. शिवसेनेने सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. नियमानुसार पालकमंत्र्यांच्या हस्ते या डेपोचे उद्घाटन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तांनी प्रोटोकॉलचा हवाला देत नियोजित उद्घाटन कार्यक्रमात खो घातला होता. त्यानंतर काही दिवसांनी कोणताही गाजावाजा किंवा उद्घाटन न करता व्यवस्थापनाने डेपोचा वापर सुरू केला आहे. सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,हे प्रकरण ताजे असतानाच उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या दोन हायब्रिड बसेसचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्राच्या जेएनएनयूआरए अंतर्गत या दोन बसेससाठी अनुदान प्राप्त झाले आहे.
मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसेस महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. अलीकडेच देशातील पहिल्या दोन हायब्रिड बसेस एनएमएमटीत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा शुभारंभही तितकाच शानदार होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. परंतु आयुक्त मुंढे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कोणताही गाजावाजा न करता वाहक आणि एका प्रवाशाच्या हस्ते सोमवारी या दोन बसेसचे उद्घाटन करून टाकले.नवीन मार्गाच्या शुभारंभापासून नामफलकांच्या उद्घाटनापर्यंतच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची सवय जडलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी मात्र कच खाल्ल्याचे दिसून आले.
(प्रतिनिधी)
प्रवाशाने केले उद्घाटन
देशातील पहिल्या हायब्रिड बसेस नवी मुंबईच्या परिवहन उपक्रमात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचे उद्घाटनही त्या स्तरावर होणे अपेक्षित होते. मात्र आयुक्त मुंढे यांनी प्रोटेकॉल जपण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर सुधाकर सोनवणे किंवा परिवहन सभापती साबू डॅनियल यांच्या हस्ते या हायब्रिड बसेसचे उद्घाटन करता आले असते. परंतु आम्ही नाही, तर तुम्हीही नाही, या अविर्भावात वावरणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी वाहक आणि प्रवाशांच्या हस्ते या बसेसचा शुभारंभ करण्याचे फर्मान सोडून पुन्हा एकदा आपला संकुचित बाणा अधोरेखित केला आहे.