महापालिकेत अधिकाऱ्यांची गटबाजी

By Admin | Updated: December 24, 2015 01:49 IST2015-12-24T01:49:38+5:302015-12-24T01:49:38+5:30

आर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. एकमेकांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली जात नाही

Officers' Grouping in Municipal Corporation | महापालिकेत अधिकाऱ्यांची गटबाजी

महापालिकेत अधिकाऱ्यांची गटबाजी

नामदेव मोरे,  नवी मुंबर्ई
आर्थिक संकटात असलेल्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे. एकमेकांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आरोग्य, विद्युत, अभियांत्रिकी, सचिव विभागासह सर्वच ठिकाणी हे प्रकार सुरू असून त्यामुळे महापालिकेची बदनामी व नुकसान होवू लागले आहे. विधान परिषदेमध्येही
याचे पडसाद उमटले असून सह शहरअभियंत्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे.
नवी मुुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत असताना दुसरीकडे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी एकमेकांविरोधात षड्यंत्र रचण्यात मश्गूल झाले आहेत. सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्याविरोधात आमदार नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. राव कनिष्ठ अधिकाऱ्यांना शिव्या देतात. महिला कर्मचाऱ्यांनाही वाईट वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
वास्तविक या विभागामधील कार्यकारी अभियंता सुनील लाड व राव यांच्यामध्ये काही महिन्यांपासून विस्तवही जात नाही. लाड व इतर काही सहकाऱ्यांनी सहशहर अभियंता शिव्या देत असल्याचे गाऱ्हाणे सर्र्वांपुढे मांडण्यास सुरवात केली आहे. लाड व इतरांच्या चौकशीचे पत्र आयुक्तांना दिल्यानंतर हे प्रकार सुरू झाल्याचे राव यांनी स्पष्ट केले होते. राव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध व्हावे यासाठी त्यांच्याच विभागातील अधिकारी प्रयत्न करू लागले आहेत. वास्तविक लाड व राव हे पालिकेतील भांडणाचे एकमेव
उदाहरण नाही. यापूर्वी शहर अभियंता मोहन डगावकर व राव यांच्यामध्येही
फारसे सौख्य नसल्याचे पहावयास मिळाले होते.
सर्वच विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी एकमेकांची बदनामी करत आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांच्यावर हिरानंदानी कराराचा ठपका ठेवून त्यांनी आरोग्य सेवेची वाट लावल्याची माहिती त्यांच्याच सहकाऱ्यांनी पसरविली. त्यांना पदावरून दूर जावे लागलेच शिवाय अनेक वर्षे कोणतीच महत्त्वाची जबाबदारी दिली नाही. त्यांच्यानंतर आलेल्या डॉ. दीपक परोपकारी यांच्याविरोधातही आरोग्य विभागातील काही सहकाऱ्यांनी जुने प्रकरण उकरून काढून त्यांची बदली करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागेवर आलेल्या डॉ. रमेश निकम यांच्यावर रुग्णालय सुरू करण्याची दिरंगाईचे कारण सांगत पदावरून दूर करत पुन्हा परोपकारींकडे पदभार देण्यात आला. यापूर्वी सचिव असलेल्या चंद्रकांत देवकर यांच्याविरोधात त्यांच्याच विभागातील एक सहकारी वाईट मत व्यक्त करत. यानंतर स्वत:ची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होत नसल्याने मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर किती वाईट आहेत हे एक अधिकारी फोन करून पत्रकारांना माहिती देवू लागले होते.
सिन्नरकर यांच्याकडेच महत्त्वाच्या पदांचा कार्यभार का अशी टीका करणाऱ्यांनी नोकरभरतीमध्ये त्यांनी घोटाळा केला असल्याची माहिती पसरविली होती. पालिकेची सर्वाधिक बदनामी होण्यास कारणीभूत असलेल्या अतिक्रमण घोटाळ्यात गुप्त चौकशी अहवाल काही अधिकाऱ्यांनीच फोडून तो बाहेरील व्यक्तींना दिला होता. मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदेंकडे, अमरीश पटनिगिरे, उपआयुक्त नाना आल्हाट, ईटीसी केंद्र संचालिका वर्षा भगत यांच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये पालिकेचेच अधिकारी व त्यांचे सहकारी यांचा समावेश होता.
वारंवार बदल्यांना सामोेरे जावे लागणारे सुभाष गायकर, रमाकांत पाटील, विद्युत विभागातील कर्मचारी रवींद्र फुणगे व इतर अनेक कर्मचारी यांच्याविरोधात त्यांच्याच सहकाऱ्यांनी बदनामीची मोहीम उघडली होती. वास्तविक अधिकाऱ्यांवर आरोप झाले पण कोणावरील आरोप सिद्ध झाला नाही व तक्रारदारांनीही त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला नव्हता. गटबाजीमुळे महापालिकेची प्रचंड
बदनामी होत असून ही गटबाजी थांबवणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Officers' Grouping in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.