घर सोडून आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: December 31, 2014 01:53 IST2014-12-31T01:53:02+5:302014-12-31T01:53:02+5:30
विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

घर सोडून आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले
अनिकेत घमंडी - डोंबिवली
विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. १८ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत कल्याणसह मुंबईतील रेल्वे स्थानकांत पळून आलेली तब्बल २२० मुले सापडली आहेत. दादर-ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘समतोल फाऊंडेशन’च्या सर्व्हेक्षणातून ही गंभीर बाब समोर आली आहे.
मुंबईच्या बालसुधार गृहांत अशा मुलांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे या मुलांची रवानगी नेमकी कुठे करायची? हा प्रश्न उभा राहिला आहे, संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
‘रेल्वे स्थानकांमध्ये अल्पवयीन मुले आढळले की, त्याची विचारपूस करत सुरक्षा यंत्रणेच्या कानावर ही बाब घातली जाते. मुलांना तातडीने बालसुधारगृहात पाठवले जाणे आवश्यक असते. मात्र आता या सुधारगृहांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे केवळ सर्व्हे करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. लांबपल्याच्या गाड्या ज्या स्थानकांमध्ये येतात त्या ठिकाणी प्रामुख्याने अशा मुलांची संख्या अधीक असते. त्यातही ठाणे, कुर्ला, दादर या स्थानकांपेक्षाही कल्याण आणि सीसएसटीमध्ये ते जास्त लवकर आढळतात,’ असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण जंक्शन मध्ये तीन दिवसांत ७० तर सीएसटी स्थानकात तब्बल १५० मुले आढळली.
सामाजिक संस्थांची भूमिका
च्पळून आलेल्या मुलांशी मैत्री करून त्यांच्यावर शिबिराच्या माध्यमातून संस्कार केले जातात. त्यानंतर हळुहळू कुटुंबाविषयी माहिती घेतली जाते. खरी माहिती मिळाल्याची खात्री पटली की, त्यांच्या देशभरात कुठेही असलेल्या पालकांशी संपर्क साधणे, त्यांना सर्व माहिती देत मुले सुखरुप असल्याचा विश्वास देणे आदी कामे सुरक्षा यंत्रणांच्या सहाय्याने केली जातात. त्यानंतर मुले पालकांच्या स्वाधीन केली जातात.
संस्थेसमोरील अडचणी : कल्याणहून भिवंडीच्या बालसुधारगृहात एखाद्या मुलाला न्यायचे असेल तर त्यासाठी सुमारे १५० रु. खर्च होतो, हा खर्च नेमका करायचा कोणी, हा प्रश्न आहे. संस्थेसमोर खर्चाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे इच्छाशक्ती प्रचंड असली तरी कामात अडचणी येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
कलेक्टरचे सहकार्य हवे : जिल्हाधिकाऱ्यासह बालकल्याण समितीने या संदर्भात सहकार्य करणे अपेक्षित असून १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बालसुधारगृहातील मुलाचे अपहरण
भिवंडी : कचेरीपाडा येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना काल पहाटे ५-१०च्या सुमारास घडली. या मुलाचे नांव इजाज फिरोज शाह(७) असे आहे. कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार बालसुधारगृहातील वैभव भगवान वेल्हाळ यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.