आता दिल्लीवारीचे वेध !
By Admin | Updated: December 21, 2014 01:58 IST2014-12-21T01:58:07+5:302014-12-21T01:58:07+5:30
प्रकल्पाच्या पाहणीसाठी उद्या २१ डिसेंबरला कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी दिल्ली येथे मार्गस्थ होत आहेत.

आता दिल्लीवारीचे वेध !
कल्याण : मौजमजा आणि फोटो सेशनने केरळ दौरा चर्चेचा विषय ठरला असताना आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी उद्या २१ डिसेंबरला कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी दिल्ली येथे मार्गस्थ होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या केरळ दौऱ्यावर तब्बल ३२ लाखांची उधळपट्टी झाली असताना दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर अंदाजे साडेपाच लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा केरळ दौरा मौजमजेच्या छायाचित्रांनी टीकेचे लक्ष ठरला होता. कचरा जाळून त्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प पाहण्यासाठी रविवारी पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी असे १६ जण दिल्लीला जाणार आहेत. यात महापौर कल्याणी पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृह नेते कैलास शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय गटनेते आणि प्रभाग समिती अध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्यासह अन्य दोघे जण देखील जाणार आहेत.
दरम्यान, उपमहापौर राहुल दामले यांच्यासह भाजपाचे गटनेते श्रीकर चौधरी आणि राष्ट्रवादीचे गटनेते नीलेश शिंदे यांनी मात्र दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. विशेष बाब म्हणजे ज्या प्रभागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे त्या उंबर्डे प्रभागाच्या नगरसेविका पुष्पा भोईर यांनी देखील दौऱ्यावर जाण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याचे फलित काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
२२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीतील केरळ दौऱ्यावर ३२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी असे ५५ जण केरळला गेले होते. या दौऱ्याच्या विमान प्रवासावर १६ लाख १५ हजार ४२० रुपये खर्च झाला असून भोजन आणि इतर प्रवासावर १५ लाख ९१ हजार ८० रुपये खर्च झाले आहेत. या दौऱ्यात प्रत्येक व्यक्तीवर ५८ हजार ३०० रुपये इतका खर्च झाला आहे. या एकूण ३२ लाख ६ हजार ५०० रुपये खर्चाच्या प्रस्तावाला शनिवारच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. यावर कोणतीही चर्चा न करता काही सेकंदांतच हा प्रस्ताव सदस्यांकडून मान्य करण्यात आला.