महापालिकेची ६,५00 सोसायट्यांना नोटीस

By Admin | Updated: June 26, 2016 00:51 IST2016-06-26T00:51:10+5:302016-06-26T00:51:10+5:30

दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील जवळपास ६,५00 गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.

Notice to Municipal Corporation's 6,500 Societies | महापालिकेची ६,५00 सोसायट्यांना नोटीस

महापालिकेची ६,५00 सोसायट्यांना नोटीस

नवी मुंबई : दैनंदिन गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न करणाऱ्या शहरातील जवळपास ६,५00 गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच या सोसायट्यांचा कचरा उचलणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कुंड्या पाहावयास मिळत आहेत.
कचऱ्याची व्यवस्थित वाहतूक व विल्हेवाट करता यावी, यादृष्टीने कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे, यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांचे विविध पातळ्यांवर प्रबोधन केले जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु त्यानंतरही अनेक सोसायट्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या अशा गृहनिर्माण सोसायट्यांना २१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. याअंतर्गत जवळपास ६,५00 सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली होती. सोसायटीत गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून दिलेल्या दोन वेगवेगळ्या कचरा कुंड्यात टाकण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक सोसायट्यांनी महापालिकेच्या या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने २२ जूनपासून अशा सोसायट्यांचा कचरा उचलण्याचे बंद केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कुंड्या दिसून येत आहेत. मागील दोन दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे कचऱ्यातून दुर्गंधी येत आहे. असे असले तरी अनेक सोसायट्यांनी लागलीच कार्यवाही करीत कचऱ्याचे वर्गीकरण करून संबंधित विभागाला कळविले आहे. त्यामुळे हा कचरा हलविण्याची पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या निर्देशानुसार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून द्यावे. त्यामुळे कचऱ्याची सुयोग्य पद्धतीने वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावणे सोपे होईल, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

कोपरखैरणे विभागातील ५७५ सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यातील कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांच्या कचऱ्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सोसायटीधारकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करू असे संबंधित विभागाला कळविले आहे. त्यामुळे या कचऱ्याची पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आल्याचे कोपरखैरणे विभागाचे स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद खोस यांनी सांगितले.

Web Title: Notice to Municipal Corporation's 6,500 Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.