जुन्या नोटांचा तपशील नाही
By Admin | Updated: June 2, 2017 05:49 IST2017-06-02T05:49:47+5:302017-06-02T05:49:47+5:30
नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांनी आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र, रायगड

जुन्या नोटांचा तपशील नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : नोटाबंदी झाल्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांनी आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (आरडीसी बँक) तो अद्यापही जाहीर केलेला नाही. ठेवीदारांमध्ये असलेला संभ्रम आरडीसी बँकेने दूर करावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली. अलिबाग येथील काँग्रेसच्या बॅ.अंतुले भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.
मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठीचा कांगावा करीत, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे हे चलन देशाच्या अर्थव्यवस्थेमधून बाद झाले आहे. ज्यांच्याकडे जुने चलन असेल, त्यांना ठरावीक मुदतीमध्ये बँकांमध्ये भरणा करण्याची मुभा दिली होती. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्हा बँकांचाही समावेश होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेने ३०० कोटी रु पयांच्या जुन्या नोटा असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बँकेने ६०० कोटी, नाशिक जिल्हा बँकेने ४०० कोटी, लातूर जिल्हा बँकेने २०० कोटी, परभणी जिल्हा बँकेने १०० कोटी, तर सोलापूर जिल्हा बँकेने ३०० कोटी रु पयांचे जुने चलन पडून असल्याचे जाहीर केले आहे; परंतु रायगड जिल्हा बँकेने आपल्याकडील जुन्या नोटांचा तपशील अद्यापही जाहीर केलेला नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ज्या शेतकरी, कामगारांच्या घामाचा पैसा आरडीसी बँकेत आहे. तीच बँक त्यांच्या खातेदार-ठेवीदार यांना अंधारात ठेवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. सहकार विभागाकडे याबाबतची माहिती मागितली होती. मात्र, सहकार विभागाने माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
सध्या खरिपाच्या हंगामाला सुरु वात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाबाबतची स्थितीही बँकेने प्रसिद्ध करावी, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा बँक अडचणीत यावी, अशी आमची भूमिका नाही; परंतु जिल्हा बँकेचा कारभार असा गोपनीय का सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, संजय सावंत, ज. गो. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आरडीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.