डीजेचा आवाज होणार धीमा
By Admin | Updated: September 1, 2015 04:45 IST2015-09-01T04:45:34+5:302015-09-01T04:45:34+5:30
पोलिसांनी ध्वनिप्रदूषण होवू नये या उद्देशाने दहीहंडी, गणपती, दुर्गा उत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील सण - उत्सवात डीजेचा

डीजेचा आवाज होणार धीमा
पनवेल : पोलिसांनी ध्वनिप्रदूषण होवू नये या उद्देशाने दहीहंडी, गणपती, दुर्गा उत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील सण - उत्सवात डीजेचा आवाज धीमा होणार आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आम्हालाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पनवेल परिसरातील बँड व्यावसायिकांमधून होत आहे.
काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी घेतलेल्या विशेष बैठकीत दहीहंडीस गणेश मंडळ, शिवभक्त मंडळ, दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना डीजेवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. आदेशाचे पालन न करणाऱ्या बँड संचालकावर कारवाईचा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला. लग्नसराईनंतर दहीहंडी, यात्रोत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सवात साऊंड सर्व्हिस बँडच्या पथकाची चांगली कमाई होते. मात्र, नव्या आदेशावरून डीजे वाजवण्यावर बंदी आली आहे.
पनवेल परिसरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी व्यवसाय करण्यासाठी डीजे खरेदी केले आहेत. आता डीजेवर निर्बंध आल्याने त्यांच्या व्यवसायावर मंदीचे सावट आले आहे. अनेकांनी कर्ज काढून डीजेची खरेदी केली, मात्र बंदी आल्याने हप्ते फेडायचे कसे असा प्रश्न डीजे व साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)