सलग दोन दशके करवाढ नाही, नवी मुंबईच्या विकासावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 06:48 AM2021-02-19T06:48:07+5:302021-02-19T06:48:21+5:30

Navi Mumbai : देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. या वर्षीच्या अर्थसंकल्पातूनही आर्थिक सुबत्तेचे दर्शन घडले.

No tax hike for two decades in a row, emphasis on Navi Mumbai development | सलग दोन दशके करवाढ नाही, नवी मुंबईच्या विकासावर भर

सलग दोन दशके करवाढ नाही, नवी मुंबईच्या विकासावर भर

googlenewsNext

नवी मुंबई : महानगरपालिकेचा तब्बल ४८२५ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प आयुक्तांनी गुरुवारी सादर केला. तब्बल २० वर्षे कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसून शहरवासीयांना दिलासा देणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका ठरली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना वैद्यकीय सुविधांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, उड्डाणपूल, क्रीडांगण, उद्यान, पार्किंग, कचऱ्यातून बायोमिथीनेशन व त्यामधून सीएनजी  निर्मितीच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. 
देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. या वर्षीच्या अर्थसंकल्पातूनही आर्थिक सुबत्तेचे दर्शन घडले. आयुक्त अभिजित बांगर यांनी सन २०२० - २१ मध्ये ४७७२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. कोरोनामुळे वर्षभर अपेक्षित उत्पन्न झाले नसल्यामुळे सुधारित अर्थसंकल्प खूपच कमी केला जाईल, असा अंदाज होता. परंतु प्रशासनाने ४७०९ कोटी रिपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. २०२१ - २२ या वर्षासाठीही आतापर्यंतचा सर्वांत विक्रमी ४८२५ कोटी  रुपयांचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे पायाभूत सुविधांना या वर्षीही अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. एमआयडीसीसह शहरातील रस्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, पदपथ, गटारे व इतर कामे करण्यासाठी ५८८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाणे - बेलापूर रोडसह पामबीच रोडवर उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ५८ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद केली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नल यंत्रणा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. सिग्नल यंत्रणेसाठी आयटीएमएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी १४ कोटी ४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 
अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. तब्बल ४९९ कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद केली असून, गतवर्षीपेक्षा १८० कोटी रुपये जादा तरतूद केली आहे. स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा संकल्प केला असून त्यासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. रुग्णालये बांधण्यासाठी ४४ कोटी खर्च केले जाणार आहेत. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 
                   (अधिक वृत्त : पान ४) 

स्मार्ट पार्किंग 
नवी मुंबईमधील वाहनांची संख्या वाढत आहे. पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे. भविष्यात वाहतूककोंडी व पार्किंगची समस्या गंभीर होऊ नये यासाठी स्मार्ट पार्किंग पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक नोडमध्ये नियोजनबद्धपणे पार्किंगची व्यवस्था करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात येणार असून शहराचा विकास वाहनपूरक शहर न होता नागरिकपूरक शहर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल
महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये मैदाने विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. घणसोलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय तरणतलाव व इतर मैदानांचा विषयही मार्गी लावला जाणार आहे. क्रीडा व सांस्कृतिक विभागासाठी १०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

बायो सीएनजी प्रकल्प
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  प्रतिदिन ६० टन ओला कचरा तयार होत आहे. या कचऱ्यातून १५० टन क्षमतेचा बायोमिथीनेशन प्रकल्प उभारणे प्रस्तावित केले आहे. यातून तयार होणारा बायाे सीएनजी महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी वापरण्यात  येणार आहे. 

अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण 
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागासाठी ५८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अग्निशमन केंद्रात व्यायामशाळा सुरू केली जाणार आहे. फायर फायटिंग मोटारबाइक  खरेदी केल्या जाणार आहेत. उंच इमारतींमध्ये फायर फायटिंग करण्यासाठी टर्न लेबर लॅडर ६८ मीटर व वॉटर ब्राऊझ ६० मीटर उंचीचे घेतले जाणार आहे.

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट
nशासनाच्या अमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात २० दशलक्ष लीटर क्षमतेचा  टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट बांधण्याचे काम सुरू केले आहे. 
nयेथील पाणी कारखान्यांना देण्यात येणार आहे. मलनि:सारण केंद्रातील पाण्याचाही उद्यान व इतर कारणांसाठी वापर करण्याचे प्रस्तावित केले आहे. 

जमेची बाजू  
तपशील     तरतूद (कोटी)
स्थानिक संस्था कर    १४०१.४६
मालमत्ता कर    ६००
विकास शुल्क    २००
पाणीपट्टी    १२२.७६
परवाना व जाहिरात शुल्क    १०.०६
अतिक्रमण शुल्क              ४.६०
मोरबे धरण व मलनि:सारण  ४१.०६
रस्ते खोदाई शुल्क            २९.१५
आरोग्य सेवा शुल्क           ११.३४
शासन योजना                 ५०५.५२
संकीर्ण जमा                   १६२७.४२


खर्चाचा तपशील 
तपशील    तरतूद (कोटी)
नागरी सुविधा    १५६१.६९
प्रशासकीय सेवा    ७३७.६३
पाणीपुरवठा    ५७९.४५
उद्यान, मालमत्ता    ४४३.५३
ई गव्हर्नन्स     १२७.१५
सामाजिक विकास    ४८.४०
स्वच्छता, घनकचरा            ३८४
शासन योजना                  ८९.२८
आरोग्य सेवा                    २७६.६७
परिवहन                         १५१
आपत्ती निवारण, अग्निशमन  ८०.८२
शासकीय कर परतावा        १२१
शिक्षण                          १७१.३८
कर्ज परतावा    ३८.१५
अतिक्रमण                      १२.५२

Web Title: No tax hike for two decades in a row, emphasis on Navi Mumbai development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.