नो पार्किंगची घोषणा हवेतच विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:59 IST2017-08-01T02:59:09+5:302017-08-01T02:59:09+5:30

शहरात वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

No parking announcement will ever be there | नो पार्किंगची घोषणा हवेतच विरली

नो पार्किंगची घोषणा हवेतच विरली

पनवेल : शहरात वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी विनम्र हॉटेल ते रायगड स्वीट्स सर्व्हिस रोड आणि ओरीयन मॉलसमोरील सर्व्हिस रोड या दोन ठिकाणी वाहतूक शाखेने नो पार्किंग करण्याचे ठरवले होते. त्यासाठीच्या हरकती अगर सूचना नागरिकांनी पाठविण्याचे आवाहन तत्कालीन पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी केले होते. मात्र नो पार्किंग झोनचे पुढे काय झाले याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे विनम्र हॉटेलजवळील नो पार्किंगची घोषणा हवेतच विरल्याचे दिसते.
पनवेल शहर व आजूबाजूच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत चालला आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. बस स्थानकापासून सर्वच ठिकाणी रिक्षाचालकांनी रिक्षा स्टँड तयार केले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. सर्व्हिस रोडवर देखील वाहने पार्किं ग केली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विनम्र हॉटेल ते रायगड स्वीट्स सर्व्हिस रोड व ओरीयन मॉलसमोरील सर्व्हिस रोड या दोन्ही मार्गांची रु ंदी १५ फूट असून या मार्गांवर रुग्णालय, हॉटेल्स, शॉप्स व शोरूम आहेत. तसेच जवळच बसस्थानक असल्याने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क केल्यामुळे वाहतूककोंडी होते. आपत्कालीन परिस्थितीत अ‍ॅम्ब्युलन्स तसेच अग्निशमन वाहनांकरिता अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी येथील रस्त्यावर नो पार्किंग घोषित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने हाती घेतला होता. मात्र याला अनेक महिने झाले असून कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. महापालिका हद्दीत सम-विषम पार्किंगचे बोर्ड लावणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: No parking announcement will ever be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.