तोटा सहन करून एनएमएमटीची प्रवाशांना सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:11 IST2020-06-21T00:11:04+5:302020-06-21T00:11:13+5:30

पहिल्या लॉकडाऊनपासून सहापट उत्पन्न घटल्यानंतरही उपक्रमाच्या वतीने अविरत सेवा सुरू आहे.

NMMT's passenger service at a loss | तोटा सहन करून एनएमएमटीची प्रवाशांना सेवा

तोटा सहन करून एनएमएमटीची प्रवाशांना सेवा

नामदेव मोरे 
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसेस प्रवाशांच्या सुविधेसाठी रोडवर धावत आहेत. प्रतिदिन ५० ते ६० हजार प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत ३९ हजार ७४६ परप्रांतीयांना घरापासून रेल्वे स्टेशन व पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य केले आहे. पहिल्या लॉकडाऊनपासून सहापट उत्पन्न घटल्यानंतरही उपक्रमाच्या वतीने अविरत सेवा सुरू आहे.
मुंबई व उपनगरांची लाइफलाइन समजली जाणारी रेल्वेसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून ठप्प झाली. शासनाने पहिला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरापासून कामाच्या ठिकाणी घेऊन कसे जायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवली तरी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उप्रकमाने २५ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ११२ बसेस उपलब्ध करून दिल्या. या बसेसच्या दिवसभर ३९८ फेºयांच्या माध्यमातून सरासरी प्रतिदिन २० हजार ४०० किलोमीटर अंतर धावण्यास सुरुवात केली. पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी, सरकारी, निमसरकारी, मेडिकल, किराणा दुकान व इतर अत्यावश्यक सेवेतील ८ ते १० हजार कर्मचाºयांना घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी एनएमएमटीमुळे आधार मिळाला.
शासनाने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली. ५ मेपासून सीबीडी, एनआरआय, नेरूळ, सानपाडा, तुर्भे, तुर्भे एमआयडीसी, एपीएमसी, वाशी, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी, डीसीपी कार्यालय, उरण, जासई, न्हावाशेवा, शेडुंग, मुंब्रा परिसरातील तब्बल ३९ हजार ७४६ प्रवाशांना सेवा दिली आहे. पूर्वी एनएमएमटीला प्रतिदिन ३८ लाख रुपये उत्पन्न होत होते.
कोरोनामुळे त्यामध्ये घट होऊन ते सहा लाख रुपयांवर आले आहे. उपक्रमाला इंधनासाठी महिन्याला २ कोटी व वेतनासाठी ७ कोटी २० लाख रुपये खर्च होत आहेत. कोरोनाच्या काळात उपक्रमाचा मासिक तोटा ६ कोटींवरून ११ ते १२ कोटींवर गेला असून, तो सहन करूनही प्रवाशांसाठी सेवा सुरू ठेवली आहे.
।रुग्णवाहिकेसाठीही बसेसचा वापर
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांना घरापासून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी पडू लागली. अनेक खासगी रुग्णवाहिकांनी सेवा बंद केल्यामुळे व मनपाकडील रुग्णवाहिका अपुºया पडू लागल्यानंतर, एनएमएमटी बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत १८ बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले असून, अजून १० बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले जाणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेत सेवा देणे शक्य होऊ लागले आहे.
>कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर एनएमएमटी बसेसच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली. चालक व वाहकांना मास्क, हातमोजे, सॅनेटायझर उपलब्ध करून दिले. एनएमएमटी बसेस नियमित सुरू राहतील व चांगल्या सुविधा देता येतील, यावर विशेष लक्ष देण्यात आले व सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत अखंडपणे सेवा देणे शक्य झाले.
- शिरीष आरदवाड,
व्यवस्थापक, एनएमएमटी

Web Title: NMMT's passenger service at a loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.