घणसोलीत साकारतेय एनएमएमटीचे आदर्श आगार

By Admin | Updated: October 6, 2015 00:54 IST2015-10-06T00:54:38+5:302015-10-06T00:54:38+5:30

घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे

NMMT's ideal depot in Ghansoli | घणसोलीत साकारतेय एनएमएमटीचे आदर्श आगार

घणसोलीत साकारतेय एनएमएमटीचे आदर्श आगार

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे तुर्भे व आसुडगाव आगारावरील ताण कमी होवून परिवहनच्या सुविधेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.
घणसोली सेक्टर १५ येथे ९.५ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर महापालिका परिवहन उपक्रमाच्या आगाराचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या या कामाला मार्च २०१६ पर्यंतची मुदत आहे. त्यानुसार उर्वरित सहा महिन्यांत हे आगार पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी शीघ्र गतीने कामे सुरूआहेत. घणसोलीचे आगार हे परिवहनच्या इतर दोन आगारापेक्षा आदर्श आगार बनवण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे. याकरिता दोन आगारात आजपर्यंतच्या जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. आगार होत असलेल्या भूखंडाच्या तीन बाजूला रस्ता असल्याने बस आत व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार बनवले जाणार आहेत.
त्याठिकाणी वाहनांची दुरुस्ती करुन धुण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय इमारत व कर्मचारी कँटीन यांचीही सोय त्याठिकाणी केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी सांगितले. परिवहनच्या ताफ्यात लवकरच १२५ नव्या बस येणार आहेत. या बस घणसोली आगारामार्फत घणसोली व कोपरखैरणे येथून सुटणाऱ्या विविध मार्गावर सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या घणसोली व कोपरखैरणे येथून पनवेल, खारघर, तळोजा, उरण अशा लांबच्या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस सुटतात. परंतु मार्ग फेरी संपल्यानंतर या बस उभ्या करण्यासाठी किंवा पुढचा मार्ग ठरवण्यासाठी तुर्भे आगारात पाठवल्या जातात. यामध्ये इंधनाचा वापर वाढून चालकांवरही ताण येतो. मात्र घणसोली येथील आगार सुरु झाल्यानंतर या सर्व मार्गावरील बस त्याठिकाणी थांबवल्या जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होवून इंधनातही बचत होणार आहे. यामुळे परिवहनच्या दृष्टीने हे आदर्श आगार ठरणार आहे. तुर्भे आगाराच्या ठिकाणी डांबरीकरणामुळे काही वर्षातच खड्डे पडू लागले होते. यामुळे त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले. या अनुभवावरुन घणसोली आगारात सुरवातीलाच काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण कामाच्या दर्जावर आयआयटीचे नियंत्रण असणार आहे.

घणसोली आगाराचे काम १८ महिन्यांच्या कामाच्या मुदतीवर देण्यात आले आहे. तुर्भे व आसुडगाव आगारात जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी भेडसावणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे परिवहनच्या सुविधेत सकारात्मक बदल होवून हे आदर्श आगार ठरणार आहे.
- शिरीष आरदवाड,
परिवहन व्यवस्थापक

Web Title: NMMT's ideal depot in Ghansoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.