पनवेलमधील निर्माल्य डम्पिंग ग्राऊंडवर
By Admin | Updated: September 26, 2015 01:15 IST2015-09-26T01:15:34+5:302015-09-26T01:15:34+5:30
शहरात गणेश विसर्जनानिमित्त जमा होणारे निर्माल्य संकलनासाठी पालिकेने बल्लाळेश्वर मंदिराजवळ निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे.

पनवेलमधील निर्माल्य डम्पिंग ग्राऊंडवर
पनवेल : शहरात गणेश विसर्जनानिमित्त जमा होणारे निर्माल्य संकलनासाठी पालिकेने बल्लाळेश्वर मंदिराजवळ निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे. मात्र निर्माल्याचे वेगळ्या पध्दतीने विघटन करण्याऐवजी आरोग्य विभाग ते डम्पिंग ग्राऊंडवर टाकत आहे.
गणेशोत्सवापूर्वी वडाळे तलावाची स्वच्छता करण्यात आली होती. बाप्पाच्या विसर्जनानंतर अनेक भाविकांकडून निर्माल्यही पाण्यात विसर्जित करण्यात येते. त्यामुळे जलाशय प्रदूषित होत असून हे टाळण्यासाठी विसर्जन तलावांजवळ निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले आहे. यासाठी रोटरी क्लबची सुध्दा मदत घेण्यात आली असून ५० स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. निर्माल्य संकलित करून विल्हेवाटीची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. त्यापासून खत निर्मिती करता येते. मात्र पालिकेकडून कोणतेही धोरण नसून निर्माल्य कचऱ्याबरोबरच क्षेपणभूमीवर टाकले जात आहे. सिडको हद्दीतील विसर्जन घाटावरही निर्माल्यासाठी विशेष सुविधा नाही. गाढी नदी, आदई तलाव, खांदेश्वर तलाव, रोडपाली तलाव या विसर्जनाच्या ठिकाणी जमा होणारे निर्माल्य सुध्दा क्षेपणभूमीवर टाकण्यात येत आहे.