उपचारासाठी नऊ तास रुग्णाची फरफट

By Admin | Updated: October 22, 2014 04:22 IST2014-10-22T04:22:29+5:302014-10-22T04:22:29+5:30

अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून पोलिसांनी एका जखमी तरुणाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात नेले

Nine hour patient care for the treatment | उपचारासाठी नऊ तास रुग्णाची फरफट

उपचारासाठी नऊ तास रुग्णाची फरफट

मुंबई : अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून पोलिसांनी एका जखमी तरुणाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार देऊन दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या जखमी तरुणाला अतिदक्षता विभागातील जागेचा पाच रुग्णालयात शोध घ्यावा लागला. यामुळे यासाठी तब्बल ९ तास फरफट झाल्याची घटना सोमवारी घडली.
सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर एका कारच्या धडकेने हा तरुण जखमी झाला. स्थानिक रिक्षाचालकाने त्याला तत्काळ विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करून पोलिसांना याबाबत कळविले. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फुले रुग्णालयात प्रथमोपचार केले. मात्र याच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करणे गरजेचे होते. मात्र सकाळीच बंद केलेल्या अतिदक्षता विभाग व उपचारासाठी अपुऱ्या सुविधांमुळे त्याला राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला.
साधारणत: साडेसातच्या सुमारास विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जीवन सरडे प्रशासनाच्या १०८ क्रमांंकाच्या रुग्ण्वाहिकेतून राजावाडी रुग्णालयच्या दिशेने रवाना झाले. राजावाडी रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी या तपासण्या केल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने जागेचे कारण देत सायन रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या जखमी तरुणाला घेऊन रुग्णवाहिका सायन रुग्णालयाच्या दिशेने निघाली. सायन रुग्णालयात पोहोचल्यावर अतिदक्षता विभागात जागा नाही. यामुळे त्या रुग्णावर कोणतेही उपचार न करता त्यांना परेलच्या केईएम रुग्णालयात घेऊन जा, असे लिहून दिले. केईएम रुग्णालयातही जागा नव्हतीच. मग यांना नक्की कोठे उपचार मिळणार, असा प्रश्न सरडे यांना पडला होता. यामुळे त्यांनी केईएम रुग्णालयातच यांना दाखल करून घ्या, असे सांगितले. मात्र जागेचे कारण पुढे करत जे.जे.मध्ये दाखल करा, असे सांगण्यात आले.
या जखमीची प्रकृती गंभीर होती. मात्र एकही पर्याय नसल्याने त्याच अवस्थेत त्यांना भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. या सगळ्या प्रकारात जे.जे. रुग्णालयात पोहोचायला पहाट उजाडली होती. पहाटे साडेचारच्या सुमारास या जखमी तरुणाला जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा मिळाली. जखमी अजूनही बेशुद्धावस्थेतच आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सायन आणि केईएम रुग्णालयात नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतात. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सायन आणि केईएमसारख्या रुग्णालयात उपचार मिळायलाच हवे होते. ९ तास उपचार का मिळाले नाहीत, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Nine hour patient care for the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.