नवजात बाळाने दिला क्ल्यू
By Admin | Updated: April 28, 2015 01:06 IST2015-04-28T01:06:22+5:302015-04-28T01:06:22+5:30
बिल्डरचा पुतण्या सुखरूप घरी आल्यानंतर एसीपी प्रफुल्ल भोसले व पथकाने त्याची चौकशी केली. अपहरणकर्त्यांची माहिती, त्यांची चेहरेपट्टी, त्यांची भाषा काही तरी दुवा मिळेल या हेतूने ही चौकशी सुरू होती.

नवजात बाळाने दिला क्ल्यू
जयेश शिरसाट ल्ल मुंबई
बिल्डरचा पुतण्या सुखरूप घरी आल्यानंतर एसीपी प्रफुल्ल भोसले व पथकाने त्याची चौकशी केली. अपहरणकर्त्यांची माहिती, त्यांची चेहरेपट्टी, त्यांची भाषा काही तरी दुवा मिळेल या हेतूने ही चौकशी सुरू होती. चौकशीत मुलाने विद्याविहारपासून अपहरण झाल्यापासून घरी परतेपर्यंतची प्रत्येक घटना सांगितली. मात्र गुन्हे शाखेला क्ल्यू दिला तो टोळीतल्या आरोपीला अपहरणनाट्यादरम्यान झालेल्या मुलाने.
मुरबाड, वणीतल्या वास्तव्यात अपहरणकर्ते अपहृत मुलासमोर स्वत:ची खरी नावे घेत नसत. इतकेच नव्हे तर मुख्य आरोपी एकदाही त्याच्यासमोर आले नव्हते. हा मुलगा ज्यांच्या नजरकैदेत होता त्यापैकी मनिष गांगुर्डे (२७) याची पत्नी प्रसूत झाली. वणीतल्या वास्तव्यात दोन आरोपींची दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा त्याने ऐकली होती. ही माहिती त्याने एसीपी भोसले व पथकाला देताच पथकाने काम सुरू केले. मनिष या मुलासमोर श्रीकांत या नावाने वावरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व नाशिक पालिकेतील जन्माच्या नोंंदी ठेवणारी कार्यालये गाठली. मनिष व श्रीकांत या नावाने (वडलांचे) नवजात मुलांच्या नोंदी शोधल्या. या दोन्ही नावांनी पथकाला सुमारे २० ते २५ नोंदी आढळल्या. प्रत्येक मनिष व श्रीकांत यांची पथकाने गुप्त चौकशी सुरू केली. असे करता करता विक्रोळी, पार्कसाइट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृहात प्रसूत झालेल्या नवजात मुलाच्या पित्याच्या चौकशीत गुन्हे शाखेचे पथक थोडे थबकले. या मुलाच्या पित्याचे नाव मनिष होते. तसेच तो वणीचा रहिवासी होता. मात्र १३ एप्रिलला त्याचा फोन दिवसभर बंद होता. तसेच त्याचा वावर मुंबई, वणी व मुरबाड या तिन्ही ठिकाणी आढळला. गुन्हे शाखेने त्वरित हालचाली करून वणी गाठले आणि मनिषची गचांडी आवळली.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वणीच्या ज्या खोलीत अपहृत मुलाला डांबण्यात आले होते ती खोली दीपक साळवेने मिळवून दिली होती. दीपक हा मनिषच्या बहिणीचा पती. या दोघांच्या चौकशीतून अपहरणनाट्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वेळ न दवडता अवघ्या काही तासांमध्ये स्वतंत्र पथके करून सर्वच आरोपी गजाआड करण्यात आले.
अपहृत मुलाला रोज मुंबईचा डबा
च्अपहरणकर्त्या टोळीने अपहृत तरुणाला सुमारे महिनाभर आपल्या तावडीत ठेवले. मात्र त्याची बडदास्तही ठेवली. तो आजारी पडू नये याची विशेष काळजी घेतली. श्रीमंत मुलाला मुरबाड, वणीतले गावरान जेवण पचनी पडणार नाही म्हणून त्याला दररोज मुंबईतला बर्गर, पिझ्झा, पास्ता हे खाद्यपदार्थ पुरवले जात. त्यासाठी टोळीतला राकेश कनोजिया (३२) हा अन्य साथीदाराला घेऊन दररोज डबा घेऊन मुंबई-वणी किंवा मुंबई-मुरबाड असा प्रवास करे.
च्गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार अपहृत तरुणाची अंगकाठी नाजूक होती. तो आधीपासूनच भेदरलेला होता. त्यामुळे तो अपहरणकर्त्यांच्या आदेशानुसारच वागत होता. त्याने एकदाही पळून जाण्याची किंवा सुटका करून घेण्यासाठीची धडपड केली नव्हती. मात्र कधी कधी त्याला कुटुंबाची आठवण येई, तो तणावग्रस्त होई. अशा वेळी त्याला अपहरणकर्ते कोरेक्स या कफसीरपची अख्खी बाटली पाजत. मुळात मुंबईत या कफसीरपचा वापर सोनसाखळीचोरांकडून नशेसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्रकरणात अपहृत तरुणाला झोप यावी यासाठी कोरेक्सचा डोस पाजला जात होता.
तरुणाची चंगळ बेतली जिवावर
मुख्य आरोपी अजित अपराजकडून अन्य आरोपी राकेश कनोजियाने काही रक्कम उधार घेतली होती. उधारी चुकवणे राकेशला जमत नव्हते. त्यातून दोघांचे वादही होत होते. उधार कसे चुकवशील या विषयावर एकदा अजितने राकेशचे बौद्धिक घेतले. त्यात त्याने एका श्रीमंत बापाच्या मुलाचे अपहरण करण्याची कल्पना राकेशला सुचवली. एकाच झटक्यात उधारी चुकती होईल आणि उर्वरित आयुष्य चैनीत जाईल या इराद्याने राकेशने अजितला होकार दिला. राकेशनेच श्रीमंत बापाच्या मुलाचा शोध सुरू केला. त्यासाठी मर्सिडीज, आॅडी अशा महागड्या कारमधून फिरणारे तरुण तो शोधत होता. तेव्हा त्याला हा तरुण आढळला. त्याने १० ते १५ दिवस या मुलाचा पाठलाग केला. महागड्या कारमधून रात्री-अपरात्री फिरणे, मित्रमैत्रिणींंवर सढळ हस्ते पैसे खर्च करणे यातून राकेशचे लक्ष्य निश्चित झाले. तसे त्याने अजितला कळवले. त्यानुसार या टोळीने अनेकदा विद्याविहारच्या निळकंठ दर्शन सोसायटीबाहेर फिल्डिंग लावली. मात्र मित्र सोबत असल्याने अनेकदा त्यांचा कट फसला. ११ मार्चला मात्र त्यांचा बेत तडीस गेला.
माथेरानचे पहिले डील फसले
१२ एप्रिलला गोरेगावला २ कोटी रुपये अपहृत तरुणाच्या कुटुंबीयांनी अपहरणर्त्यांना दिले. मात्र त्याआधी हे डील माथेरानला ठरले होते. पैसे घेऊन येणाऱ्याला गाडीची टेललाइट सुरू ठेवण्याचा इशारा अपहरणकर्त्यांनी दिला होता. त्यानुसार त्याने टेललाइट सुरू ठेवलीही. मात्र अंधार असल्याने व भेटीचे ठिकाण जंगल असल्याने तेथे उपस्थित अपहरणकर्ते आणि कुटुंबीयांची चुकामूक झाली. दोन्ही ठिकाणे अपहरणकर्त्यांनी विचार करून निवडली होती. जेथून दुचाकीवरून पसार होता येईल आणि त्यामागे चारचाकी वाहने येऊ शकणार नाहीत.