सिडकोचा तळोजात नवीन गृहप्रकल्प
By Admin | Updated: July 26, 2016 04:55 IST2016-07-26T04:55:49+5:302016-07-26T04:55:49+5:30
सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी २ हजार ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित

सिडकोचा तळोजात नवीन गृहप्रकल्प
- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी २ हजार ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यादृष्टीने निविदा काढण्यात आल्या असून साधारण दिवाळीपर्यंत या गृहप्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याची शक्यता सिडकोच्या सूत्राने व्यक्त केली आहे.
सिडकोने यापूर्वी विविध घटकांसाठी साधारण दीड लाख घरे बांधली आहेत. डिसेंबर २0१९ पर्यंत आणखी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने व्यक्त केला आहे. त्यापैकी खारघर येथे स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प आणि उलवे येथे या प्रकल्पाअंतर्गत तीन हजार ६00 घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित ५१ हजार ४00 घरांची टप्प्याटप्प्याने निर्मिती करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात १३,८१0 घरांचा समावेश आहे. पहिला टप्पा सुध्दा दोन भागात विभागण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या भागात ७१७९ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी १३२0 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागातील ६६३१ घरे बांधली जाणार असून त्यासाठी १२२0 कोटी रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उर्वरित ३८ हजार ३१७ घरे बांधून पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, सध्या पहिल्या टप्प्यातील १३,८१0 घरांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तळोजा येथे उभारण्यात येणाऱ्या या गृहप्रकल्पासाठी एकूण २ हजार ५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार अलीकडेच निविदा काढण्यात आल्या असून साधारण पुढील दोन-तीन महिन्यात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. या प्रकल्पातील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ३0८ चौरस फूट आणि ३७0 चौरस फूट असे असणार आहे.
प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प
सर्वसामान्यांना बजेटमधील घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार २0१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने बाळगले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. ही घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.