नेरुळचा आर्यन खुराणा नवी मुंबईत प्रथम

By Admin | Updated: June 4, 2017 03:54 IST2017-06-04T03:54:12+5:302017-06-04T03:54:12+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसएई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील सर्वच सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

Nerul's Aryan Khurana first in Navi Mumbai | नेरुळचा आर्यन खुराणा नवी मुंबईत प्रथम

नेरुळचा आर्यन खुराणा नवी मुंबईत प्रथम

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसएई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील सर्वच सीबीएसई शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नेरुळमधील आर्यन खुराणा या विद्यार्थ्याने ९९ टक्के गुण संपादन केले आहेत. आर्यन हा नेरुळमधील दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे.
आर्यनला मिळालेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. मिळालेल्या यशामुळे खूपच आनंद झाला असून, एक यशस्वी इंजिनीअर बनायचे आहे, अशी प्रतिक्रिया आर्यनने व्यक्त केली. यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी सरावावर अधिक भर दिला पाहिजे आणि ध्येय निश्चित केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला आर्यन दिला. नेरुळमधील रुचीरा रेड्डी या विद्यार्थिनीला ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत, तर संचित गुप्ता या विद्यार्थ्याला ९७.८ टक्के गुण मिळाले आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधील २३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २०५ विद्यार्थ्यांनी ८६ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
बेलापूरमधील भारती विद्यापीठ शाळेतील पूजा मुल्या या विद्यार्थिनीला ९२.६ टक्के, तर विधी ठक्कर हिला ९१ टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे यश संपादन केल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक आनंद बागल यांनी व्यक्त केली.

दिव्यांग गटातील अंजली यादवला ८४.२० टक्के
- शारीरिक अपंगत्वावर मात करत, खारघरमधील रामशेठ ठाकूर शाळेच्या अंजली यादव हिने ८४.२० टक्के गुण मिळविले आहे. अंजलीला इंग्रजी विषयात ८६, हिंदीमध्ये ८७, माहिती तंत्रज्ञान यामध्ये ९१, विज्ञानामध्ये ८१ आणि समाजशास्त्रात ८२ गुण मिळाले आहेत.
- शिक्षकांनी आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन,अभ्यासात केलेली मदत, तसेच वर्षभर घेतलेली मेहनत यामुळेच हे यश संपादन करणे सोपे झाल्याचे अंजलीने स्पष्ट केले. शाळेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अंजलीचे विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.

Web Title: Nerul's Aryan Khurana first in Navi Mumbai