दुचाकीस्वारांसाठी नेरुळ पूल ठरतोय मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: March 10, 2017 04:25 IST2017-03-10T04:25:13+5:302017-03-10T04:25:13+5:30
नेरुळ पुलाच्या दुरुस्तीकरिता पाडण्यात आलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भेगांवरून जाणाऱ्या भरधाव दुचाकींचे तोल जात असून यामध्ये एखाद्याचा बळीही

दुचाकीस्वारांसाठी नेरुळ पूल ठरतोय मृत्यूचा सापळा
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
नेरुळ पुलाच्या दुरुस्तीकरिता पाडण्यात आलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भेगांवरून जाणाऱ्या भरधाव दुचाकींचे तोल जात असून यामध्ये एखाद्याचा बळीही जाण्याची शक्यता आहे; परंतु महिन्याहून जास्त कालावधीपासून या भेगा जैसे थे असून पुलाच्या दुस्तीचेही काम ठप्प आहे.
सायन-पनवेल टोल कंपनीच्या निविदेपाठोपाठ रस्त्याचा व पुलाच्या कामाच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त होत आहे. याच सायन-पनवेल मार्गावर नव्याने बांधलेल्या शिरवणे येथील पुलाची प्रत्येक चार ते पाच महिन्यांनी डागडुजी करावी लागत आहे. तर पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात पुलावरील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. सायन-पनवेल मार्गावरील चौकाचौकांतली वाहतूककोंडी सुटावी व जलद रहदारी व्हावी, यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. अशातच नेरुळ येथील पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले आहेत. त्याकरिता पुलावर भेगा पाडण्यात आल्या आहेत. दुरुस्तीसाठी वापरले जाणारे डांबर घट्ट बसावे यासाठी या भेगा पाडण्यात आल्या आहेत; परंतु मागील महिन्यापासून हे काम ठप्प असल्यामुळे त्या भेगा मृत्यूचा सापळा ठरत आहेत. पुलावरील निम्याहून अधिक मार्गावर या भेगा आहेत. त्यावरून दुचाकी गेल्यास भेगांमुळे दुचाकीचे चाक डगमगून चालकांचा तोल जातो. अशा वेळी दुचाकीच्या जवळपास दुसरे एखादे वाहन असल्यास त्यांच्यात धडक बसण्याची शक्यता आहे. अथवा भेगांमुळे भरधाव दुचाकीचा तोल जाऊन एखाद्याचा बळीही जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही दुरुस्तीसाठी पाडलेल्या पुलावरील भेगा तशाच ठेवून कामाच्या ठेकेदाराकडून दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा रचण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून पुलाच्या निम्या भागात दुरुस्तीचे साहित्यही ठेवण्यात आलेले आहे. यामुळेही पुलावर वाहतूककोंडी होत आहे. तर पुलावर सुरू असलेल्या कामाची माहिती पुलाच्या सुरुवातीलाच फलकाद्वारे देण्यात आलेली नाही. यामुळे चौकातली वाहतूककोंडी टाळण्यासाठी थेट पुलावरून जाणाऱ्यांची पुलावरच कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणचे संभाव्य गंभीर अपघात टाळावेत, अशी मागणी सदर मार्गावरील वाहनचालकांकडून केली जात आहे.