खारघरमधील शिल्पांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; माकडांच्या प्रतिकृतीसमोर गवत वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:33 IST2020-10-11T23:33:09+5:302020-10-11T23:33:20+5:30
देखभाल न केल्यामुळे कारंजे तुटून गेले आहेत. शिल्पाकृतींवर घाण पडली असून, या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

खारघरमधील शिल्पांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; माकडांच्या प्रतिकृतीसमोर गवत वाढले
पनवेल : सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून खारघरची ओळख आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन शिल्पाकृती बसविल्या आहेत. त्यांची दुरवस्था झाली असून, देखभाल करण्याकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे.
नवी मुंबई, पनवेलची उभारणी करताना सिडकोने ठिकठिकाणी शिल्प बसविली आहेत. खारघरमधील उड्डाणपुलाखाली भरतनाट्यम कला सादर करणाऱ्या कलाकारांची प्रतिकृती तयार केली आहे. त्याच्याखाली कारंजे बसविण्यात आले होते, परंतु देखभाल न केल्यामुळे कारंजे तुटून गेले आहेत. शिल्पाकृतींवर घाण पडली असून, या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
उड्डाणपुलाच्या खाली तीन माकडे बसविण्यात आली आहेत. एका माकडाकडे मोबाइल, एकाकडे दुर्बीण दाखविण्यात आली आहे. ‘थ्री मंकी पॉइंट’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या शिल्पाकृतीभोवती गवत वाढले आहे. यामुळे माकडांची प्रतिकृती व्यवस्थित दिसत नाही. देखभाल केली जात नसल्यामुळे नागरिकांनी सिडकोविषयी नाराजी व्यक्त केली आहे.