पनवेलमध्ये नाला व्हिजनची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:55 IST2019-01-16T23:54:40+5:302019-01-16T23:55:13+5:30
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गटारांची अवस्था बिकट झाली आहे.

पनवेलमध्ये नाला व्हिजनची गरज
- अरुणकुमार मेहेत्रे
कळंबोली : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गटारांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांमधील पाणी रोडवर येत आहे. झाकणे नसल्यामुळे गटारांमध्ये पडून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल व पूर्वीच्या नगरपालिका कार्यक्षेत्रामधील स्थितीही बिकट झाली असून, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नाला व्हिजन राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पनवेल शहरात एमएमआरडीच्या माध्यमातून काही मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काही रस्ते महापालिकेने तयार केले आहेत. मात्र, त्या ठिकाणच्या पदपथांची स्थिती फारशी चांगली नाही. शहरातील झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी तर पदपथ गायबच झाले आहेत. त्या ठिकाणी अतिक्र मण झाले असल्याने गटार गायबच झाले आहेत. कित्येक ठिकाणी गटारे उघडीच दिसतात, त्यामुळे पनवेलकरांना चालणे जिकिरीचे बनत आहे. शाळेच्या आजूबाजूची स्थितीही बिकट झाली आहे. सिडको वसाहतीत म्हणजेच नवीन पनवेल, खांदा वसाहत आणि कळंबोलीत पावसाळी गटारे आहेत. मात्र, त्यांच्यावरील झाकणे गायब आहेत, यामुळे पादचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक संकुल, रुग्णालये त्याचबरोबर सोसायट्यांच्या आजूबाजूला ही स्थिती असल्याने नागरिकांकडून सिडकोकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्यांच्याकडून उपाययोजना केल्या जात नाहीत.
पनवेल-मुंब्रा महामार्गालगत १२ वर्षांपूर्वी सिडकोने तयार केलेले १२ फूट खोल बंदिस्त पावसाळी गटार अपूर्ण आहे. काही ठिकाणी स्लॅब बाकी आहेत, तर झाकणेही गायब आहेत, या बाबत शिवसेनेने आवाज उठवून वस्तुस्थिती सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. कामोठे वसाहतीत मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाºया रस्त्यालगत पदपथावरच खडी टाकण्यात आलेली आहे. अंतर्गत भागातील गटारांवरील बरीच झाकणे दिसत नाहीत. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात गटारांची स्थिती बिकट झाली आहे. पदपथावरून चालताना शाळकरी मुले व नागरिक गटारात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासन याकडे गांर्भीयाने पाहणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सहा महिन्यांत तीन दुर्घटना
उघडी गटारे तसेच झाकणे नसल्याने लहान-मोठे अपघात घडतात. काही दिवसांपूर्वी कळंबोलीतील सेक्टर-१0 ई येथील ऋ षी सुब्रमण्यम हा शाळकरी मुलगा उघड्या गटारात पडून गंभीर जखमी झाला होता. तक्का येथे एक ४२ वर्षांची एक व्यक्ती गटारात पडली होती. कामोठे सेक्टर २२ येथे एक ज्येष्ठ व्यक्ती उघड्या गटारामुळे जखमी झाली होती.
या ठिकाणची अवस्था बिकट
च्पनवेल शहर : पटेल मोहल्ला, इंडी दवाखाना, जयमहाराष्ट्र बेकरी, ग्रामीण रुग्णालय, वसंतकृपा इमारत उरण रोड, पंचरत्न हॉटेल, आशादीप सोसायटी, साई प्लाझा, लक्ष्मी वसाहत, चॅनेल प्लाझा तक्का, गोदरेज स्काय गार्डनजवळ, तक्का.
च्कामोठे : खांदेश्वर रेल्वेस्टेशन रोड, आचार्या रामेश वसतिगृहासमोर.
च्कळंबोली : सेक्टर-१५, स्वॉन सोसायटी, सेक्टर-१६ उमा पॅलेस, सेक्टर-१४मधील अंतर्गत रोडलगतचे गटारे, सेंट जोसेफ हायस्कूल.
च्खांदा वसाहत : आसूडगाव डेपो, नवरत्न बिल्डिंग सेक्टर-८.
च्नवीन पनवेल : फिनिक्स हॉटेलसमोर, आदई तलावाजवळ, जलधारण जलाव सेक्टर-१४.
गटारांची दुरुस्ती तसेच झाकणे बसविण्याकरिता महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. लवकरच बांधकाम विभाग याबाबत कार्यवाही करेल. पनवेल शहर आणि समाविष्ट गावात ही कामे केली जातील.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त, पनवेल महापालिका
कळंबोली आणि कामोठे वसाहतीतील बहुतांशी ठिकाणी आम्ही नव्याने झाकणे बसवली आहेत. तरीसुद्धा कुठे गटारे उघडी असतील तर त्याबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल.
- गिरीश रघुवंशी,
कार्यकारी अभियंता, सिडको