जानकरांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

By Admin | Updated: October 15, 2016 06:59 IST2016-10-15T06:59:38+5:302016-10-15T06:59:38+5:30

बारामतीची वाट लावण्याचे वक्तव्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे

NCP's protest against Jana's statement | जानकरांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

जानकरांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

नवी मुंबई : बारामतीची वाट लावण्याचे वक्तव्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे वाशीत निदर्शने करण्यात आली. जानकर यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेलेली आहे, त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत असल्याची टीका प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत रासपाचे मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशीत निदर्शने करण्यात आली. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच मिळालेल्या मंत्रीपदाची हवा जानकरांच्या डोक्यात गेल्याची टीका नाईक यांनी व्यक्त केली, तर यामुळेच ते बेताल वक्तव्य करत असल्याचाही पलटवार त्यांनी केला.
बारामतीची वाट लावण्याची भाषा करण्यापूर्वी तिथल्या विकासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलेले आहे हे जाणून घ्यावे असाही टोला त्यांनी मारला.
बारामतीची वाट लावण्यासाठी जानकरांना १०० जन्म घ्यावे लागतील असाही टोला संजीव नाईक यांनी मारला. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार, पक्षप्रतोद जयाजी नाथ, दिनेश पारेख, जब्बार खान यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's protest against Jana's statement