नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणार; पालिका, सिडको, आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार

By योगेश पिंगळे | Updated: March 19, 2025 14:50 IST2025-03-19T14:50:09+5:302025-03-19T14:50:26+5:30

या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याच्या तपासणीसाठी प्रत्येक विभाग स्तरावर समितीची स्थापना केली आहे.

Navi Mumbai's parking woes will soon be resolved; Municipal Corporation, CIDCO, RTO to form divisional committee | नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणार; पालिका, सिडको, आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार

नवी मुंबईतील पार्किंगचा तिढा लवकरच सुटणार; पालिका, सिडको, आरटीओ विभागीय समिती स्थापन करणार

नवी मुंबई : नियोजित शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत वाहने पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ती सोडविण्यासाठी पार्किंग धोरणात सुधारणा करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, सिडको, आरटीओ आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. 

    या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याच्या तपासणीसाठी प्रत्येक विभाग स्तरावर समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून वाहने पार्किंगच्या जागांची पाहणी करून निश्चिती करणे, अत्यावश्यक सेवा, शाळा, रुग्णालये, स्मशानभूमींच्या ठिकाणी विनाशुल्क पार्किंग आणि जड अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागांचा शोध घेणे ही कामे केली जाणार आहे.

शहरात पार्किंगची शिस्त लागून पार्किंगच्या जागांमध्ये वाढ करून पार्किंगचा तिढा सुटावा, यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक विभाग कार्यालयानुसार समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये महापालिकेसह सिडको, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. समितीच्या माध्यमातून त्या विभागातील अहवाल मागविला असून, समितीला कामे निश्चित करून दिली आहेत.

महासभेत सुधारित प्रस्ताव
२००२ साली महासभेत पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणी आणि दर निश्चित केले होते. दरांमध्ये सुधारणा करण्यासाठी २०१८ साली प्रशासनाने महासभेत सुधारित प्रस्ताव सादर केला होता, परंतु महासभेने सदर प्रस्ताव परत पाठविला होता. 
दर निश्चित करून साधारण २३ वर्षे झाली असून, पे अँड पार्क धोरणात सुधारणा करणे आवश्यक असल्याने, वाहने उभी करण्याचा वेळ व त्यासाठी आकारण्यात येणारे दर, जागा आदी नक्की केल्या आहेत. 

शहरातील पार्किंग धोरणात सुधारणा करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस उपआयुक्त, सिडको आणि आरटीओ यांची एक बैठक झाली आहे. बैठकीत एक आराखडा तयार केला असून, कोठे नव्याने पार्किंग, मोफत पार्किंग, पे अँड पार्किंग किंवा कोठे अल्टरनेट पार्किंग याकरिता धोरण ठरविले असून, हे व्हेरिफाय करण्यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यावर येत्या काही दिवसांत पुढील बैठक होईल.
भागवत डोईफोडे, उपायुक्त मालमत्ता, न.मुं.म.पा.

गरजेचे भूखंड आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्याची तयारीही नवी मुंबई पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली  आहे. या भूखंडांचा वापर पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Web Title: Navi Mumbai's parking woes will soon be resolved; Municipal Corporation, CIDCO, RTO to form divisional committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.