दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईही ‘एरोसिटी’; विमानतळासाठी सिडकोचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:07 AM2020-02-07T00:07:25+5:302020-02-07T00:08:01+5:30

लवकरच जागतिक निविदा

Navi Mumbai too 'aerosity' on Delhi soil; CIDCO's project for the airport | दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईही ‘एरोसिटी’; विमानतळासाठी सिडकोचा प्रकल्प

दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईही ‘एरोसिटी’; विमानतळासाठी सिडकोचा प्रकल्प

Next

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. या विमानतळाच्या अनुषंगाने आवश्यक सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यावर सिडकोने भर दिला आहे. दळणवळणाच्या प्रभावी साधनांबरोबरच विमानतळाच्या सानिध्यात सुमारे ६० हेक्टर जागेवर एरोसिटी अर्थात हवाई शहर उभारण्याची सिडकोची योजना आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. त्यानुसार विमानतळाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सिडकोने भर दिला आहे. दळणवळणाच्या प्रभावी साधनांबरोबरच विमानतळ क्षेत्रात ६० हेक्टर जागेवर भव्या एरोसिटी अर्थात हवाई शहर उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. या हवाई शहरात पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स व इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणार आहेत.

विमान प्रवाशांचा प्रवास, खरेदी आणि निवास एकाच ठिकाणी असावा, या दृष्टीने या हवाई नगरीचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या नियोजित हवाई शहरात सिडको कोणतेही बांधकाम करणार नाही. पंचतारांकित हॉटेलसाठी येथील भूखंडांची लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. प्रस्तावित नगरीत अलिशान मॉल्ससुद्धा प्रस्तावित करण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळाबाहेर अशाप्रकारची एरोसिटी उभारण्यात आली आहे. यात १७ पंचतारांकित हॉटेल्स व मॉल्स आहेत.

दिल्ली एरोसिटीतून अवघ्या काही मिनिटांत विमानतळ गाठता येते. त्यासाठी दिल्ली मेट्रो या एरोसिटीला जोडण्यात आली आहे. दिल्ली एरोसिटीच्याच धर्तीवर नवी मंबई विमानतळाजवळ एरोसिटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मेट्रो खांदेश्वर येथून नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार आहे. तेथून हीच मेट्रो पुढे प्रस्तावित एरोसिटीला जोडण्याची सिडकोची योजना आहे. दरम्यान, या हवाई नगरीतील भूखंड विक्रीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

दळणवळणाच्या साधनांवर भर

सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारीही बाजूचा शास्त्रोक्त व नियोजनबद्ध विकास व्हावा, या दृष्टीने सिडकोने मास्टर प्लान तयार केला आहे. यात सार्वजनिक वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबई विमानतळाशी संलग्नता वाढावी, यादृष्टीने न्हावा शेवा-शिवडी सागरी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गावरून मुंबईहून अवघ्या २२ मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार आहे. त्याचप्रमाणे सीएसटी कॉरिडोर, सी-लिंकला जाणारा सागरी मार्ग, नवी मुंबई मेट्रो व वॉटर ट्रान्स्पोर्टवर सिडकोने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Navi Mumbai too 'aerosity' on Delhi soil; CIDCO's project for the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.