Navi Mumbai: ‘हार्बर’च्या १९ रेल्वे स्थानकांतील एस्कलेटर्सचा प्रस्ताव रखडला
By कमलाकर कांबळे | Updated: April 2, 2024 13:35 IST2024-04-02T13:34:44+5:302024-04-02T13:35:35+5:30
Navi Mumbai News: सायबर सिटीतील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने सिडकोने हार्बर, ट्रान्स हार्बरच्या १९ रेल्वे स्थानकांत सरकते जिने अर्थात एस्कलेटर्स बसविण्याचा निर्णय घेतला होता. सल्लागार नियुक्त करून आराखडा तयार करण्याचीही कार्यवाही सुरू केली.

Navi Mumbai: ‘हार्बर’च्या १९ रेल्वे स्थानकांतील एस्कलेटर्सचा प्रस्ताव रखडला
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - सायबर सिटीतील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने सिडकोने हार्बर, ट्रान्स हार्बरच्या १९ रेल्वे स्थानकांत सरकते जिने अर्थात एस्कलेटर्स बसविण्याचा निर्णय घेतला होता. सल्लागार नियुक्त करून आराखडा तयार करण्याचीही कार्यवाही सुरू केली. परंतु तांत्रिक अडचणीचे कारण देत हे काम करण्यास असमर्थता दर्शवित सिडकोने ही जबाबदारी आता मध्य रेल्वेवर ढकलली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवी मुंबई हार्बर, ट्रान्स हार्बर आणि सीवूडस-उरण असे तीन रेल्वे कॉरिडॉर आहेत. त्या माध्यमातून दरदिवशी लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. विशेष म्हणजे या सर्व स्थानकांची निर्मिती सिडकोने केली आहे. त्यामुळे या स्थानकांची देखभाल आणि डागडुजी करण्याची जबाबदारीसुद्धा सिडकोचीच आहे. हार्बर मार्गावरील सर्वच स्थानकांची रचना अत्याधुनिक दर्जाची आहे. वाशी आणि बेलापूर ही स्थानके तर सिडकोच्या वास्तुशास्त्र कौशल्याची उत्तम उदाहरणे म्हणून ओळखली जातात. सीवूड्स-उरण मार्गावर खारकोपर स्थानकसुद्धा अशाच पद्धतीने आकार घेत आहेत.
विशेष म्हणजे नव्याने आकार घेत असलेल्या सीवूडस-उरण सर्वच स्थानकांत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्याकडे सिडकोचा कल आहे. मात्र यापूर्वी बांधलेल्या हार्बर मार्गावरील १३ आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ६ अशा एकूण १९ रेल्वे स्थानकांत अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे.
दीड वर्षाचा कालावधी निश्चित, पण...
या कामासाठी दीड वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्तावही मागविले होते. परंतु हा प्रस्तावसुद्धा अडगळीत पडला आहे. कारण रेल्वे स्थानकांत एस्कलेटर्स बसविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे सिडकोने मध्य रेल्वेकडे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेनेच हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी विनंतीसुद्धा सिडकोने केल्याचे समजते.
प्रत्येक स्थानकांत भुयारी मार्ग आहेत. प्रवाशांना फलाटावर ये-जा करण्यासाठी पायऱ्या आहेत. परंतु ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी कोणत्याच सुविधा नाहीत.
वाढत्या तक्रारीची दखल घेत सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी एका विशेष समितीची स्थापना केली होती. प्रत्येक रेल्वे स्थानकांतील सुविधांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला दिले होते. या समितीच्या शिफारशीवरून नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत सरकते जिने बसविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने
घेतला होता.