स्वच्छता अभियानाचे चळवळीत रूपांतर
By नामदेव मोरे | Updated: July 28, 2025 11:23 IST2025-07-28T11:22:00+5:302025-07-28T11:23:25+5:30
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महापालिकेला सर्वोच्च सुपर स्वच्छ मानांकन प्राप्त झाले आहे.

स्वच्छता अभियानाचे चळवळीत रूपांतर
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका (शब्दांकन : नामदेव मोरे)
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महापालिकेला सर्वोच्च सुपर स्वच्छ मानांकन प्राप्त झाले आहे. देशात तिसरा व राज्यातील पहिला क्रमांक कायम ठेवण्यातही यश आले आहे. स्वच्छता अभियानाचे चळवळीत रूपांतर करण्याच्या हा प्रवास आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी उलगडून दाखविला.
स्वच्छता अभियानात वेगळेपण काय?
उत्तर : स्वच्छ सर्वेक्षण हे स्पर्धेपुरते मर्यादित न राहता स्वच्छता ही नियमित सवय झाली पाहिजे यावर लक्ष दिले. प्रत्येक शहरवासीयाला अभियानात सहभागी करून घेण्यासाठी वर्षभर सातत्याने उपक्रम राबविले जातात. स्वच्छतादूत, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक संघटना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण साेसायटी ते तृतीयपंथी नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकांना सामावून घेतले. सर्वाधिक लोकसहभाग आणि सिटिजन फिडबॅक यामुळेच स्वच्छ शहर ही ओळख निर्माण करून अभियानाचे चळवळीत रूपांतर करणे शक्य झाले.
कचरा व्यवस्थापनातील वेगळेपण काय ?
उत्तर : शहरात रोज ७५० टन कचरा निर्माण होतो. ३५० टन ओला व ४०० टन सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो क्षेपणभूमीवर नेला जातो. कचरा वाहतुकीसाठी मिनी टिपर्स, इलेक्ट्रिक ट्रक, कचरा कॉम्पॅक्टर्स असा २०६ वाहनांचा ताफा आहे. प्रत्येक वाहनावर रिअर टाइम ट्रॅकिंग मार्ग नियंत्रणासाठी आरएफआयडीसह जीपीएस ट्रॅकर बसविले आहेत. कचरा संकलन व वाहतुकीच्या प्रत्येक टप्प्यावर अत्याधुनिक तंत्राद्वारे लक्ष ठेवले जाते.
कचरा प्रक्रियेसाठी कोणते प्रकल्प आहेत?
उत्तर - मोठ्या गृहनिर्माण सोसायटी हॉटेल अशा कचरा निर्मितीच्या ३८ ठिकाणीच बायोगॅस व खतनिर्मिती केली जाते. उद्यानांमध्येही कंपोस्ट पिट तयार केले. क्षेपणभूमीवर ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती, तर बांधकामाच्या कचऱ्यातून पेव्हर ब्लॉक तयार केले जातात. नारळाच्या कचऱ्यातून दोरी व काथ्या तयार केला जातो. प्लास्टिकपासून आरडीएफ तयार करून त्याचा वापर सिमेंट व बॉयलर्स उद्योगात होत आहे. जुन्या डम्पिंग ग्राउंडचे निसर्ग उद्यानात रूपांतर केले. विद्यमान डम्पिंग ग्राउंडचा पर्यटनस्थळाप्रमाणे विकास केला आहे.
लक्ष वेधणारा एखादा प्रकल्प आहे का ?
उत्तर - केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत टेक्सटाइल कमिटी व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या कपड्यावर प्रक्रिया करणारा देशातील एकमेव प्रकल्प नवी मुंबईत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या भाषणात या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. या अंतर्गत २५० सोसायटी व पालिकेच्या ४७ थ्री आर सेंटरमधून जुने कपडे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते.
सुविधा काय आहेत ?
उत्तर - शहरात मलनिस्सारण वाहिन्याचे जाळे ९९.९ टक्के आहे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्याने व उद्योगांसाठी वापर केला जातो. पाणीपुरवठ्याची उत्तम सुविधा असून, ४६५ सार्वजनिक शौचालये बांधून त्यांचे लोकेशन गुगल मॅपवर उपलब्ध केले आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतादूतांचा दर्जा दिला आहे. कचरामुक्तीचे सेव्हन स्टार मानांकन, ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन प्राप्त केले आहे.
भविष्यातील योजना काय ?
उत्तर - स्वच्छता अभियानातील मानांकनाचा चढता आलेख कायम ठेवणे हे मूळ उद्दिष्ट. भविष्यात कचऱ्यातून वीजनिर्मिती, बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.