Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी
By योगेश पिंगळे | Updated: October 3, 2023 15:32 IST2023-10-03T15:32:04+5:302023-10-03T15:32:19+5:30
Navi Mumbai: नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे.

Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - नवी मुंबई आरटीओसाठी नेरुळ येथे प्रशस्त इमारत उभारण्यात आली असून या इमारतीमध्ये अद्याप कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. दसऱ्याच्या आगोदर नवीन कार्यालयाचे उदघाटन करून कामकाज सुरु न केल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यालयाच्या प्रतिकात्मक उद्घाटनाचा इशारा सावंत यांनी दिला आहे.
वाशी येथील धान्य मार्केटच्या आवारात नवी मुंबईचे आरटीओ कार्यालय सुरु आहे. या कार्यालयात विविध समस्या निर्माण झाल्याने तसेच इमारत देखील धोकादायक झाल्याने शासनाच्या माध्यमातून नेरुळ येथे आरटीओ कार्यालयासाठी इमारत निर्माण करण्यात आली असून कार्यालयाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. मात्र या इमारतीचे उदघाटन करण्यात आले नसून आरटीओचे कामकाज जुन्याच इमारतीमधून सुरु आहे. कार्यालय तयार असतानाही उद्घाटनासाठी विलंब करणे योग्य असून दसऱ्याच्या आत उद्घाटन करून कार्यालय सुरू न केल्यास दसऱ्याच्या मूहूर्तावर नवी मुंबई कॉंग्रेसतर्फे कार्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा काँग्रेसच्या माध्यमातून नवी मुंबई आरटीओ प्रशासनाला देण्यात आला.