Navi Mumbai: मुंबईभवतीच्या टोलनाक्यांमधून संपूर्ण राज्यातील रस्ते होतील दुरुस्त, शर्मिला ठाकरेंचा टोला
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 29, 2023 00:37 IST2023-10-29T00:35:49+5:302023-10-29T00:37:44+5:30
Navi Mumbai News: वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली.

Navi Mumbai: मुंबईभवतीच्या टोलनाक्यांमधून संपूर्ण राज्यातील रस्ते होतील दुरुस्त, शर्मिला ठाकरेंचा टोला
नवी मुंबई - वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी मुंबईच्या प्रवेशावर असलेल्या पाच टोलनाक्यांवर होणाऱ्या वसुलीतून राज्यातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होऊ शकते अशी भावना व्यक्त केली.
टोल नाक्याच्या ठिकाणी होणाऱ्या टोल वसुलीचा हिसाब काढण्यासाठी मनसेतर्फे सर्वच टोलनाक्यांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई मनसेतर्फे देखील वाशी व ऐरोली टोलनाक्यावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यापैकी वाशी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी दिवसाला एका लाखाहून अधिक वाहने टोलनाक्यावरून ये जा करत असल्याचे देखरेखमध्ये समोर आल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईत प्रवेशाच्या पाच ठिकाणी असलेल्या टोलनाक्यांवर होणाऱ्या टोल वसुलीतून संपूर्ण राज्यातील रस्त्यांची देखभाल होऊ शकते असाही टोला त्यांनी मारला.
तर टोल घेऊनही दरवर्षी रस्त्याची दुरावस्था होत असल्याने संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याची देखील गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, माऊली थोरवे, आरती धुमाळ, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम, अभिजित देसाई, संदीप गलुगडे, संदेश डोंगरे आदी उपस्थित होते.